धनगर आरक्षण मोर्चातूून परतत असलेल्या परभणी जिल्ह्यातील आंदोलनकर्त्यांच्या वाहनाला अंजनखेडजवळ भिषण अपघात.

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

“दोघे जागीच ठार, तिघे गंभीर जखमी”; पहाटे चारची घटना

माहूर तालुका प्रतिनिधी/विजयसिंह हजारी
माहूर – आजच्या डिजिटल युगात मानवाचे जीवनमान जेवढे गतीमान तेवढेच धोकादायक झाले आहे.चंद्रावर पोहचलेला मानव सूर्याच्या दिशेने वाटचाल करतोय.परंतु,मृत्यू कधी?कसा?कुठे होणार? या गोष्टीचे पूर्वानुमान लावण्यात तो असमर्थ असल्याने कोणाचा मृत्यू कुठे होईल हे सांगता येत नाही.या गोष्टीची प्रचीती माहूर तालुक्यातील अंजनखेड जवळ आज मंगळवार दि.१२ डिसेंबर रोजी पहाटे चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास घडलेल्या भिषण वाहन अपघातातून आली.
धनगर आरक्षण मोर्चात सामील होण्यासाठी नागपूर येथे गेलेल्या परभणी जिल्ह्यातील आंदोलनकर्त्यांच्या वाहनाला सारखणी ते माहूर राष्ट्रीय महामार्गावरील अंजनखेड जवळ भिषण अपघात होऊन कारमधील दोघे जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी झाल्याची अतिशय धक्कादायक घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यातील सरफराजपूर येथील चालकासह पाच जण धनगर आरक्षण मोर्चात सामील होण्यासाठी नागपूर येथे गेले होते.तेथून परतीच्या मार्गावर असताना वाटेत चंद्रपूर येथे देवदर्शन घेवून एमएच ०२ बीपी ९८३६ या क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारने परतत होते. दरम्यान सारखणी आणि वाई बाजार या दोहोंच्या मध्यांतरावर असलेल्या अंजनखेड या गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर पहाटे चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास या कारचा भिषण अपघात होऊन कारमधील दोघांचा जागीच दुर्दैवाने मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

या भिषण धडकेत स्विफ्ट डिझायर कारच्या समोरील बाजूचा अक्षरश: चुराडा होवून यातील लक्ष्मण पंडितराव वाघमारे वय ४० वर्ष व रमेश दत्तराम वाघमारे वय ५० वर्ष या दोघांचा जागीच मृत्यू झाला..
तर बापूराव मारुती वाघमारे वय ४७ वर्ष,रंगराव संपतराव वाघमारे
वय ३१वर्ष (चालक,राम बालाजी बनसोडे वय;३५ वर्ष या तिघांना गंभीर जखमी अवस्थेत माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर उपचार करून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना यवतमाळच्या शासकीय रूग्णालयाकडे रेफर केल्याचे सांगण्यात आले आहे…

सध्या हिवाळ्यातील बोचरी थंडी सुरू असून,पहाटेच्यापारी रस्त्यासह परिसरात दाट धुक्याची गडद चादर सर्वत्र फैलावलत असल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना स्पष्ट दिसून येत नसल्याने वाहन चालवणे अवघड होत आहे.अशातच पहाटे चारच्या सुमारास घडलेल्या अपघातातील स्विफ्ट डिझायर या वाहनाने पुढे जाणा-या मोठ्या अवजड वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा भिषण अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरील लोकांच्या चर्चेवरून मिळाली आहे.

सिंदखेड पोलीस ठाण्याचे रात्रपाळी गस्ती वाहन हे त्याठिकाणावरुन जात असताना गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.तातडीने घटनेची माहिती सपोनि सुशांत किंनगे यांना देण्यात आली.माहिती मिळताच त्यांनी अपघातस्थळी धाव घेऊन घटनास्थळी पंचनामा करून पोलीस उपनिरीक्षक एस.पी.
नागरगोजे,पोलीस नायक सतिश,
हवालदार दारासिंह चौहान,
हवालदार कदम यांच्या मदतीने अपघातात गंभीर जखमी असलेल्या तीन जणांना ॲम्बुलंसद्वारे माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात तर या भिषण अपघातात जागीच मृत्यू झालेल्या दोघांना वाई बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले.घटनेचा पुढील तपास व कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याने अपघाताबाबत अधिकची माहिती प्राप्त होवू शकली नाही.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!