माहूरगडावर श्री दत्त जयंती उत्सव;घटस्थापनेने दत्त नवरात्रांभ

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी

माहूर – श्री दत्त शिखर संस्थान माहूरगड येथे श्री दत्त जयंती उत्सव-२०२३ ची आज मार्गशीर्ष शु.७ मंगळवार दि.१९ डिसेंबर रोजी घट स्थापनेने दत्त नवरात्रारंभ झाले असून, मार्गशीर्ष शु.१४सोमवार २५ डिसेंबर रोजी श्री दत्तात्रेय जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

दत्त शिखर येथे प.पू.महंत श्री मधुसूदन भारती गुरू अच्च्युत भारती यांच्या आदेशाने व कृपाशीर्वादाने सर्वप्रथम सर्वतीर्थ कुंडावर विधीवत पूजाअर्चा करुन दत्त मंदिरात वासुदेव भारती महाराज यांच्या हस्ते कलशाला व निशाणाला अभिषेक करण्यात आले.त्याचे पौरोहित्य ॠषीकेश जोशी,विलासराव जोशी यांनी केले.यावेळी महंत महाराजांचे प्रतिनिधी मुख्य पुजारी श्री वासुदेव भारती,श्री धनराज भारती, ब्राह्मण पुजारी ॠषीकेश जोशी,वामन भारती महाराज, सुजान भारती,नितेश भारती यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

महाराष्ट्रात प्रामुख्याने माहूर, औदुंबर, गाणगापूर, नृसिंहवाडी, कुरवपूर या ठिकाणी मोठ्या उत्साहाने दत्त जयंतीचा सण उत्सव स्वरूपात साजरा केला जातो.मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेचा दिवस हा दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो.यंदा दत्त जयंती २५ डिसेंबर मंगळवार या दिवशी आहे.माहूर गडावरील श्री दत्त शिखर संस्थानच्या वतीने श्री दत्तात्रेय मंदिर येथे प.पू.महंत मधुसूदनजी भारती गुरू अच्च्युतजी भारती यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त जयंती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दत्त जयंतीच्या दिवशी पहाटे लवकर उठून दत्त मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेण्याची परंपरा आहे.तसेच दत्त जयंती दिवशी अनेक भाविक गुरुचरित्र हा दत्त गुरुंच्या कार्यावर बेतलेल्या विशेष ग्रंथाचे वाचन करतात.मंत्रोच्चार देखील केले जातात.’श्रीपाद श्रीवल्लभ’ हा दत्ताचा पहिला अवतार आहे,’श्री नृसिंह सरस्वती’ हा दुसरा अवतार तर ‘स्वामी समर्थ’ हा तिसरा अवतार आहे.माहूरगडावरील श्री दत्त शिखर हे भगवान दत्त प्रभूंचे जन्म स्थान आहे.येथे दत्त जन्म साजरा करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक हजेरी लावतात.जवळच दत्त माता सती अनसूया देवीचे व अत्रीमूनी ॠषींचे मंदिर,आश्रम आहे.तर शहरात महानुभाव पंथाचे दत्तात्रेय प्रभूंचे निद्रास्थान म्हणून ओळखले जाणारे देवदेवेश्वर मंदिर आहे.याठिकाणी सुद्धा येथील महंतांच्या वतीने भाविकांच्या मोठ्या संख्येत दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो.

श्री दत्तात्रेय जयंती निमित्ताने श्री दत्तात्रेय संस्थान,शिखर येथे विविध कार्यक्रम पुढीलप्रमाणे…. 

पहिली पालखी-मार्गशीर्ष शु.१०/११ शुक्रवार दि.२२ डिसेंबर, दुसरी पालखी-मार्गशीर्ष शु.१२ शनिवार २३, तिसरी पालखी- मार्गशीर्ष शु.१३ रविवार २४ रोजी,चौथी पालखी व दत्त जन्म सोहळा-मार्गशीर्ष शु.१४ सोमवार २५ रोजी,पाचवी पालखी-

मार्गशीर्ष शु.१५ मंगळवार दि.२६ डिसेंबर रोजी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे.तसेच दि.२७ मार्गशीर्ष कृ.१ बुधवार रोजी दुपारी दहीहंडीचा भव्य कार्यक्रम होणार आहे.तर दि.२८ डिसेंबर.मार्गशीर्ष कृ.२ गुरुवार या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी पहाटे काकडा आरतीनंतर माहूरगडावरील श्री दत्तात्रेय शिखर संस्थानच्या वतीने साजरा करण्यात येणाऱ्या दत्त जयंती उत्सवाची धार्मिक व पारंपरिक पद्धतीने रितसर सांगता करण्यात येईल.यादरम्यान भाविकांसाठी संस्थानवर दानशूर भाविकांच्या वतीने दररोज महाप्रसादरुपी अन्नदानाचा भंडारा आयोजित करण्यात येतो.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!