मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने अतिशय मोलाची कामगिरी बजावली. संविधानाचा उत्कृष्ट नमुना तर त्यांनी बनवलाच मात्र,त्या पाठीमागचे तत्त्वज्ञानही त्यांनी स्पष्टपणे जगासमोर मांडले.भारत देशाला अखंड ठेवणे या गोष्टीला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या प्रसंगी देशातील जातीवाद आणि उच- नीच भेदभावा व्यतिरिक्त समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणे आणि डॉ. बाबासाहेब यांच्या स्वप्नातील भारत घडविणे हे महत्त्वाचे आहे,असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती- रमेश बैस यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिली कारकीर्दिला ५ जुलै रोजी 1923 मुंबई उच्च न्यायालयातून सुरुवात झाली.या ऐतिहासिक घटनेस 100 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी )मुंबई आणि गोवा अधिवक्ता परिषद कोकण प्रांत,मुंबई विद्यापीठ आणि बार काॅन्सिल आॅफ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात “डॉ. आंबेडकर अ ज्युरिस्ट”या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शताब्दी वर्षात इतिहासाचे संशोधक आणि अभ्यासक डॉ.संभाजी बिरांजे यांच्या ” करवीर संस्थान,बॅरिस्टर आंबेडकर आणि कोर्ट कचेरीतील बहिष्कृत ” या ग्रंथवजा पुस्तकाचे मा. राज्यपाल – रमेश बैस यांच्या शुभहस्ते आणि बार्टि संस्थेचे महासंचालक मा. सुनील वारे व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले.
विदेशातून डॉ. आंबेडकर हे बॅरिस्टर बनून आल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती मोठी हालाखीची होती. ऐतिहासिक माणगाव परिषदेत राजश्री शाहू महाराज यांनी डॉ. आंबेडकर यांची जबाबदारी जणू दत्तोबा पवार आणि अॅड. तुकाराम गणेशाचार्य यांच्यावर जणू दिली होती. बॅरिस्टर बनलेले डॉ. आंबेडकर कोल्हापुरात येताच गणेशाचार्य यांनी “बॅरिस्टर आंबेडकर यांचे कार्यालय” असा बोर्ड आपल्या वकिलीच्या कार्यालयावर लिहून ठेवला. त्यामुळे करवीर संस्थान, इंचलकरंजी संस्थान, सांगली संस्थान, निपांणकर संस्थान, आणि कुरुंदवाड संस्थान अशा अनेक संस्थानातील कोर्ट केसेस गणेशाचार्य यांच्याकडे येत राहिल्या.त्या एकत्र करणे,त्यांच्या फीज निश्चित करून तसा पत्रव्यवहार मुंबईतील डॉ. आंबेडकर यांना दत्तोबा पवार यांच्यामार्फत केला जात असे. त्याचबरोबर आपल्या नात्या -गोत्यातील मित्र – मंडळींच्या केसीस डॉ. आंबेडकर यांच्याकडे पाठवून देण्यात येत असत. यामधून डॉ. आंबेडकर यांची सामाजिक, वृत्तपत्रिय व राजकीय कारकिर्द सुरु राहण्यासाठी मोठा हातभार लागत असे. त्यांची कौटुंबिक परिस्थिती सुधारण्यास यामुळे मोठी मदत होत असे .याविषयीचे दुर्मिळ दस्तऐवज आणि संदर्भ डॉ. संभाजी बिरांजे यांनी सदर ग्रंथात नमूद केले आहेत. डॉ. आंबेडकर यांनी महाराष्ट्रात महार-मांग अशा असंख्य परिषदा घेतल्याचे संदर्भ मिळतात पण, महार- मांग यांच्यातील संघर्षाच्या कोर्ट केसेस आणि त्याही स्वतः डॉ. आंबेडकर यांनी चालवलेल्या पाहायला मिळणे तसे कठीण आणि दुरापास्तच होते.गेल्या साठ वर्षाच्या कालावधीमध्ये असा प्रयत्न कोणाकडून झाल्याचे पाहायला मिळत नाही. परंतु हे अवघड आणि जोखमीचे काम डॉ. संभाजी बिरांजे यांनी अखंड संशोधन आणि परिश्रमाच्या माध्यमातून सिद्ध केले आहे. सामाजिकदृष्ट्या हा ऐतिहासिक आणि दुर्मिळ दस्तऐवज जतन करून ठेवणे भावी पिढ्यांच्या हितासाठी निश्चितच योग्य ठरणार आहे.याप्रसंगी डॉ.बळीराम गायकवाड संपादित “चिंतनातील क्रांतीसुर्य- डॉ. बाबासाहेब आंबेडकर” हा ग्रंथही प्रकाशित झाला असून डॉ. आंबेडकर यांच्या विविध पैलूंवर तो चांगला प्रकाश टाकतो. या कार्यक्रमासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश – देवेंद्रकुमार उपाध्याय, राज्याचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे अध्यक्ष अॅड.विवेकानंद घाडगे, अधिवक्ता परिषदेच्या राष्ट्रीय सचिव अॅड.अंजली हेळेकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.