निर्मळ मनाचे पारदर्शी व्यक्तिमत्व – मा. डी. पी. सावंत साहेब

abhishek bakkewad
9 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/

नांदेड : महाराष्ट्राला मोठा गौरवशाली राजकीय इतिहास व वारसा आहे. शिवछत्रपींची भूमी म्हणून साऱ्या विश्वाला परिचित असणाऱ्या महाराष्ट्राने नेहमीच देशाला नेतृत्व व दिशा दिली आहे. जेव्हा-जेव्हा देशावर म्हणजे हिमालयावरती संकट आले, तेव्हा महाराष्ट्र म्हणजे इथला सह्याद्री धावून गेला आहे. राष्ट्राच्या कठीण काळात नेहमीच महाराष्ट्रातील नेत्यांनी देशाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्यात नीतिमान व संस्कारशील नेते दिवंगत यशवंतरावजी चव्हाण ते महाराष्ट्राचे आधुनिक भगीरथ श्रद्धेय डॉ. शंकररावजी चव्हाण साहेब यांचा गौरवाने उल्लेख करावा लागेल. निष्कलंक चारित्र्याचे महामेरू म्हणून सर्वच पक्षानी ज्यांना गौरविले त्या श्रद्धेय डॉ. शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच मा. डी पी सावंत साहेब यांनी समाजकारण व राजकारणाचे धडे घेतले. महाराष्ट्राचे लोकनेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचे शालेय व महाविद्यालयीन जीवनातील अत्यंत जवळचे व विश्वासू मित्र म्हणून मागील पाच दशकांपासून मा.डी पी सावंत साहेब त्यांच्यासोबत एकनिष्ठ आहेत. निर्मळ, नि:स्वार्थ मैत्री कशी असते याचे उत्तम उदाहरण मा. अशोकरावजी चव्हाण साहेब व मा. डी. पी. सावंत साहेब यांचे देता येईल. राजकारण हे जनसेवेचे प्रभावी माध्यम आहे, त्यात वैयक्तिक स्वार्थ कधीही येता कामा नये, हा विचार डी. पी. सावंत साहेब कायमच जपत आले आहेत.

1 जुलै 1959 ला मुंबई येथे एका मध्यमवर्गीय संस्कारित कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे मुळगाव कोकणात, जन्म, बालपण व शिक्षण मुंबईत,तर सामाजिक, शैक्षणिक,राजकीय कार्यभूमी ही मराठवाड्यतील नांदेड राहिली आहे. अतिशय शांत व सयंमी स्वभावाचे डी. पी. सावंत साहेब हे उच्चशिक्षित आहेत. इंग्रजीवर कमालीचे प्रभुत्व असणारे डी.पी. सावंत साहेब यांना शिक्षणाविषयी कायमच मोठी आस्था राहिली आहे. शिक्षण हे सर्वदूर पोहोचले पाहिजे. ज्ञानी, विद्वान, प्रतिभावंत तरुण-तरुणीने अध्यापनाच्या क्षेत्रात उतरले पाहिजे, यासाठी ते तळमळीने काम करतात.
“दुरितांचे तीमिर जावो” या ध्येयाने उभारलेल्या श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे दीर्घकाळ नेतृत्व श्रद्धेय डॉ. शंकररावजी चव्हाण साहेब यांनी केले. ग्रामीण भागात राहणाऱ्या बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे हा मूळ उद्देश या संस्थेचा आहे. आजही ही संस्था याच उद्देशाने कार्यप्रवण आहे. “के.जी. टू पी.जी.” शिक्षण देणारी ही संस्था संख्यात्मक आणि गुणात्मक पातळीवर मराठवाड्यात आघाडीवर आहे. आजही या संस्थेत विद्यार्थ्यांचा प्रवेश असो,की अध्यापकांची भरती असो, ती केवळ नि केवळ गुणवत्ता या एकाच निकषावर होते. महाराष्ट्र शासनाच्या दलितमित्र व आदर्श शिक्षण संस्था या पुरस्काराने सन्मानित असणाऱ्या श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष, आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, संस्थेच्या उपाध्यक्षा, सौ.अमिताभाभी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मा.डी. पी. सावंत साहेब संस्थेचे सचिव म्हणून अतिशय उत्कृष्ट काम करीत आहेत.
काळाप्रमाणे सुसंगत असे रोजगाराभिमुख शिक्षण, शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून नांदेड व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी डी. पी. सावंत साहेब नेहमीच प्रयत्नरत असतात.एक काळ नांदेडमध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर मुले लातूर, अहमदपूरला जात होती. मा. डी. पी. सावंत साहेब यांनी यशवंत महाविद्यालयाच्या माध्यमातून ‘ जीनियस बॅच ‘ निर्माण केली. त्यामुळे लातूर अहमदपूर कडे जाणारा लोंढा थांबला. या जीनियस बॅचच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी पात्र ठरले.आज नांदेड एज्युकेशनल हब झाले आहे. याचे श्रेय मात्र शिक्षणतज्ञ असणार्‍या डी.पी.सावंत साहेब यांना जाते. ते केवळ श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी मधील विद्यार्थ्यांना आणि अध्यापकाना मार्गदर्शन करतात असे नाही, तर नांदेड व मराठवाड्यातील नामांकित असणाऱ्या शिक्षण संस्था देखील मा. डी. पी. सावंत साहेबांचे नेहमीच मार्गदर्शन घेत असतात.
ते नेहमीच मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, प्राध्यापक,विद्यार्थी यांना वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन करतात.
काँग्रेस पक्षाच्या विविध उपक्रम, कार्यक्रम, आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होऊन, पक्ष संघटन वाढीसाठी मा.डी. पी. सावंत साहेब आपर मेहनत घेत आहेत. प्रत्येक कार्यक्रमातील त्यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवीत असते.
मा. डी. पी. सावंत साहेब यांच्या
नि: स्वार्थ कार्याची दखल घेऊन काँग्रेस पक्षाने त्यांची नुकतीच अखील भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्यपदी निवड केली आहे. प्रत्येक काम अगदी मन लाऊन व तेवढ्याच प्रामाणिक भावनेने करणारे डी. पी. सावंत साहेब हे
नांदेडच्या क्रीडा, कला,संगीत, सांस्कृतिक कार्य व शैक्षणिक चळवळीसी जोडलेले आहेत. मा. डी. पी. सावंत साहेब हे तरुण आणि विद्यार्थ्यामध्ये कमालीचे लोकप्रिय आहेत. सर्वसामान्य शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक अडचणी मोठ्या आस्थेने व आपुलकीने ते सातत्याने सोडवितात.
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, लोकाभिमुख व विकासाभिमुख आमदार म्हणून, पुढे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम अविस्मरणीय असेच आहे. मा. अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघाबरोबर जिल्ह्याचाही त्यांनी विकास घडवून आणला.
नांदेड शहराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभवात भर घालणारे लोकराजे छत्रपती राजश्री शाहूजी महाराज व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भव्य व आकर्षक पुतळ्यांच्या परिपूर्तीसाठी लोकनेते राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय डी. पी. सावंत साहेबांनी खूप मेहनत घेतली. छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या जागेच्या निश्चितीपासून ते पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यापर्यंत त्यांनी केलेला पाठपुरावा आम्हाला जवळून पाहता आला. सामाजिक समतेची, न्यायाची, शैक्षणिक कार्याची प्रेरणा देणारे, हे महामानवांचे पुतळे नव्या पिढीसाठी दीपस्तंभ ठरतील. 2009आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत डी. पी. सावंत साहेब यांनी प्रचंड मताधिक्याने विजय संपादित केला होता. 2019 ची विधानसभा निवडणूकही डी. पी.सावंत साहेब सहज जिंकतील आणि विजयाची हॅट्रिक करतील असे साऱ्यांनाच वाटत होते. कारण मागील दहा वर्षाच्या कार्यकाळात मतदारसंघात प्रचंड विकास कामे झाली आहेत. रस्ते,पिण्याचे पाणी,आरोग्य, शाळेसाठी वर्गखोल्या,समाज मंदिरे, गावांना जोडणारे पूल, यासह असंख्य कामे त्यांनी मार्गी लावली होती. उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाला पक्का रस्ता, शेतीला पाणी पुरवणाऱ्या कॅनॉलची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांनी केली. नांदेड शहराच्या उत्तर भागासाठी आसना नदीवर पर्यायी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली. मराठवाड्यातील सर्वात मोठी निमशहरी पाणीपुरवठा योजना वाडी बुद्रुक या ठिकाणी कार्यान्वित करून वाडी गावासह तीस नगरातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या त्यांनी कायमची दूर केली. डॉ शंकररावजी चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 110 करोड रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण विभागाला नवा आयाम व उंची प्राप्त झाली.
ज्ञानी, विद्वान,व्यासंगी,अभ्यासू व तेवढेच सोज्वळ आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून मा.डी.पी.सावंत साहेब यांच्याकडे पाहिले जाते.परवाच मराठी अपडेट या वाहिनीच्या माध्यमातून त्यांची एक प्रकट मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली.त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, शिक्षण , आदरणीय लोकनेते चव्हाण साहेबांशी त्यांची घट्ट मैत्री, मंत्रीपदावर असताना त्यांनी घेतलेले निर्णय व कार्य, राजकारण, समाजकारण यावर अनेक प्रश्न विचारून मी साहेबांना बोलते केले. त्यांचा सुंदर असा जीवनपट उलगडून दाखवणारी ही प्रकट मुलाखत नांदेडसह मराठवाड्यातील शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांना खूप भावली.मुलाखतकार म्हणून मलाही अनेकांचे फोन आले. मीही धन्य झालो.
निरपेक्ष भावना व स्वच्छ भूमिकेतूनच जनतेचे उत्तरदायित्व म्हणून त्यांनी नांदेड उत्तर विधानसभा क्षेत्राचा कायापालट केला.खरे तर मा.डी पी सावंत साहेब हे राजकारणाच्या पलीकडले व्यक्तिमत्व आहे.
त्यामुळे डी. पी. सावंत साहेब 2019 च्या निवडणुकीत सहजच बाजी मारतील असे वाटत होते, परंतु धर्मनिरपेक्ष मतांची झालेली विभागणी, सध्याच्या राजकारणाची बदललेली परिभाषा या सर्वांचा परिणाम म्हणून डी. पी. सावंत साहेब यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला. निवडणुकीत माझा पराभव झाला तरी चालेल, पण मी कोणत्याही मतदारांना पैसे, दारू वाटणार नाही. कोणत्याही अनैतिक गोष्टीचा सहारा घेऊन मला निवडणूक जिंकायची नाही, ही उच्च नैतिक भूमिका डी. पी. सावंत साहेब यांनी घेतली. आपले राजकारणातील नैतिक अधिष्ठान ढळू दिले नाही. खरे तर अशा उच्चशिक्षित, प्रतिभाशाली, नि: स्वार्थ आणि नीतिमान राजकीय नेतृत्वाची केवळ मतदार संघालाच नव्हे तर, नांदेड जिल्हयाला, राज्याला गरज आहे.
येणाऱ्या भविष्य काळात अशा सुजाण व सुसंस्कृत नेतृत्वाला जनता नक्कीच पुन्हा उभारी देईल यात काहीच शंका नाही.

अच्छे लोग हमारी जिंदगी मे आना,
हमारा खुश नसीब होता है,
पर उन्हे संभाल कर रखना हमारा हुन्नर होता है…

हा हून्नर नांदेडची जनता भविष्यात सोडणार नाही हीच अपेक्षा…. मा. डी पी सावंत साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!! त्यांच्या हातून उत्तमोत्तम सामाजिक,शैक्षणिक व राजकीय सेवा घडावी.त्यासाठी त्यांना निरोगी,दीर्घ,आयू,आरोग्य लाभावे हीच विधात्याकडे विनम्र प्रार्थना

प्रा.संतोष देवराय जिल्हाध्यक्ष काँग्रेस व्यक्त सेल व इजिं.हरजिंदर सिंघ संधू शहर जिल्हाध्यक्ष सो.मी.काँग्रेस, जिल्हा सरचिटणीस प्रेस संपादक व पत्रकार सेवासंघ नांदेड ,

Share This Article
error: Content is protected !!