यात जमिनी खरडून केल्यामुळे मागणी केलेल्या ३१ कोटी ७३ लाखांच्या मागणीचा उल्लेख नाही.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/
नांदेड – जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. हा फटका जिल्ह्यातील कंधार व लोहा तालुके वगळता इतर १४ तालुक्यांतील सहा लाख ३९ हजार २८७ शेतकऱ्यांना बसला होता.
या शेतीपिकांच्या नुकसानीबद्दल ४२० कोटी ४६ लाखांच्या रकमेला शासनाने मंजुरी दिली. पण यात जमिनी खरडून केल्यामुळे मागणी केलेल्या ३१ कोटी ७३ लाखांच्या मागणीचा उल्लेख नाही.
जुलैमध्ये तुफान पाऊस सर्वच तालुक्यांत बरसला होता. परंतु शेतीपिकांचे नुकसान मात्र कंधार व लोहा तालुका वगळता इतर १४ तालुक्यांत झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला दिला होता. या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील सहा लाख ३९ हजार २८७ शेतकऱ्यांना बसला.
यात चार लाख ९० हजार ९८३ हेक्टरवरील जिरायती पिकांचे, एक हजार ४९६ हेक्टर बागायती, तर २६० हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले होते.
यात शेतीपिकाच्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी ४२० कोटी ४६ लाख, तर जमिनी खरडून केलेल्या आठ हजार ७२३ शेतकऱ्यांना भरपाईसाठी ३१ कोटी ७३ लाख रुपये अशी एकूण ४५२ कोटी २० लाख रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली होती.
हे सानुग्रह अनुदान जिरायतीसाठी हेक्टरी आठ हजार पाचशे, फळपिकांसाठी हेक्टर २२ हजार पाचशे रुपये तर बागायती पिकांसाठी १७ हजार रुपये प्रतिहेक्टर दोन मर्यादेपर्यंत मिळणार आहेत.
संपूर्ण जमिनी खरडून गेलेल्या ५५२९ हेक्टर क्षेत्राच्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ४७ हजार प्रमाणे २५ कोटी ९८ लाख, तर दुसऱ्याच्या शेतातील माती वाहून पिकांचे नुकसान झालेल्यांना ३१९१ हेक्टर क्षेत्राच्या शेतकऱ्यांना १८ हजार रुपये प्रतिहेक्टर प्रमाणे पाच कोटी ७४ लाख रुपये मिळणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ३१ कोटी ७३ लाख रुपयांची मागणी केली होती. शासनाने काम मंजुरी दिलेल्या आदेशात या रकमेचा उल्लेख नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.