नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड : जिल्यातील धर्माबाद येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या मोठमोठ्या अनेक दगडावर ( शिलांवर) रंगरंगोटी करून लेक वाचवा,लेक शिकवा,लेक घडवा,स्त्री भ्रूणहत्या,पर्यावरणाचे संरक्षण, झाडे लावा,झाडे जगवा, माझी वसुंधरा, स्वच्छता,जल ही जीवन हे, वाहतुकीचे नियम अशा विविध विषयांवरील चित्रे शिलांवर काढत परिसरातील नागरिकांतून जनजागृतीचे कार्य करीत असल्याचे चित्ररूपी दाखवून दिले असून महाविद्यालयीन परिसर सादरील दगडावरील चित्रामुळे अतिशय विलोभनीय दिसू लागला आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कमलाकर कणसे यांनी एप्रिल महिन्यात महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारला.आणि अवघ्या पाच ते सहा महिन्यांच्या कालावधीतच “एकच ध्यास महाविद्यालयाचा विकास” या उक्तीप्रमाणे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध भौतिक तसेच शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत,आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी शैक्षणिक प्रगतीसह विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध स्तरावरील विविध कलाप्रकारात सहभागी झाला पाहिजे,आणि महाविद्यालयाचे नावलौकिक झाले पाहिजे,यादृष्टिकोनातून महाविद्यालयातील क्रीडा विभाग,राष्ट्रीय सेवा योजना विभाग,राष्ट्रीय छात्र सेना विभाग,सांस्कृतिक विभाग तसेच इतर भाषाविषयक विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन महाविद्यालयात करण्यात येत आहे.
त्यातील एक भाग म्हणून ऑक्टोबर महिन्यात विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या “युवक महोत्सव २०२३” मध्ये सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड चाचणी करुन,ललित कला प्रकाराच्या सरावा दरम्यान महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या मोठ्या शिलांना रंगरंगोटी करून त्यावर विविध सामाजिक जनजागृती विषयक चित्रे काढण्याचा प्राचार्य डॉ.कमलाकर कणसे यांचा संकल्प महाविद्यालयातील ललित कला प्रकारातील श्रावणी येवतीवाड, तेजस्विनी धुप्पे, प्राची कुलकर्णी,ईश्वर सोनटक्के,इत्यादी विद्यार्थ्यांनी पूर्ण केला आहे.
सदरील ललित कला प्रकारातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.योगेश जोशी, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. आर.जी.शेवलीकर,ललित कला प्रशिक्षक डॉ.माधव हळदेकर यांनी केले आहे.