{मुस्लिम समाज भारावला}
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड :दि.१३.नायगाव -उमरी -धर्माबाद विधानसभेचे आमदार राजेश पवार यांनी मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या धर्माबाद शहरातील कब्रस्तानाच्या आद्ययावती करण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांचा निधी पहिल्यांदाच मंजूर केल्यामुळे मुस्लिम समाज अक्षरशः भारावला आहे.
आमदार राजेश पवार हे आपल्या मतदार संघात कुठलाही पक्षभेद व जात भेद करीत नसल्याचे सूर्यप्रकाशाएवढे आता स्पष्ट झाले असून नायगाव मतदारसंघातील उमरी येथे नुकताच त्यांनी उपरोक्त पार्श्वभूमीवरच मुस्लिम समाजाच्या अनेक कामांसाठी जवळपास पावणेदोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. सबका साथ,सबका विकास, व सबका विश्वास या त्यांच्या ब्रीदवाक्यानुसार त्यांनी कुठलाही भेदभाव न करता निधी मंजूर करीत आहेत.महिनाभरापूर्वीच आमदार राजेश पवार आकस्मिकपणे धर्माबाद मध्ये येऊन अख्या धर्माबाद शहरात गल्लोगल्ली मध्ये दुचाकी वर जाऊन नेमका कुठे व कसा विकास साधायचा याचा आढावा घेतला होता.त्यावेळेस नुसरत कन्स्ट्रक्शन कंपनीचे मोईजोद्दीन बिडीवाले यांच्या नेतृत्वात धर्माबाद येथील मुस्लिम समाजाचे जवळपास 200 वलयांकित व्यक्तिमत्व आमदार राजेश पवार यांना भेटून आपल्या समस्या बद्दल ज्ञात केले होते.
त्या अनुषंगाने आमदार राजेश पवार यांनी तात्काळ पावले उचलत धर्माबाद येथील मुस्लिम कब्रस्तान (मोठा) संरक्षण भिंत,प्रवेशद्वार, अंतर्गत सीसी रस्ता,जनाना नमाज ओठा,परिसर सुशोभीकरण यासाठी 50 लक्ष रुपये निधी मंजूर केला असून त्याच धर्तीवर धर्माबाद नगरपालिका कार्यकक्षेतील रत्नाळी (मौलाली नगर) मुस्लिम कब्रस्तान संरक्षक भिंत बांधकामासाठी तब्बल पन्नास लक्ष रुपयाचा निधी मंजूर केल्यामुळे धर्माबाद शहरातील मुस्लिम समाज अक्षरश: भारावला आहे.
मराठा समाज आरक्षणासंदर्भात उभा महाराष्ट्र पेटला असताना अनेक गावात आमदार- खासदार यांच्यासह स्थानिक नेत्यांना गावबंदी करण्यात आली होती.पण विकास कामे खोळंबू नये यासाठी आमदार राजेश पवार काल पण अचानकपणे धर्माबादला कुणालाही न सांगता येऊन प्रशासकीय यंत्रणेला सोबत घेऊन दुचाकीवर गल्लीबोळातून फिरले व आपला निधी योग्य ठिकाणी वापरला जाणार का? याबद्दल जायजा घेत अजून कुण्या ठिकाणी विकास साधता येते का त्याबद्दल माहिती घेत लगेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्याचे अंदाजपत्रक बनवायला सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत तालुका अध्यक्ष विजय डांगे, उपाध्यक्ष रमेश अण्णा गौड,युवा आघाडीचे शहराध्यक्ष सतीश मोटकुल यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.