माहूर तालुका प्रतिनिधी/विजयसिंह हजारी
माहूर : शहरात दिनांक २९ जून रोजी घडलेल्या अनुचित दुर्दैवी प्रकाराने माहूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.पोलिसांच्या सतर्कतेमुळे व सर्वधर्मीय नागरिकांनी सामंजस्यानी घेतल्याने प्रकरण निवळले असून,नागरिकांनी माहूर शहरात शांतता,एकोपा व बंधुभाव राखण्याचे आवाहन नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केले आहे.
माहूर शहरात गुरवारी जी घटना घडली त्याची वेळीच दखल घेत पोलीस प्रशासनाने येथे शांतता व कायदा सुव्यवस्था प्रस्थापित केलेली आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे,भोकर यांनी शहरात तळ ठोकून माहूरचे पोलीस निरीक्षक डॉ.नितीन काशीकर यांनी सहकाऱ्यांसोबत शांतता व कायदा सुव्यवस्था प्रस्थापित केलेली आहे.दहा पैकी पाच आरोपींना अटक करण्यात आलेली असून, ५ आरोपींनी पोलीसांना सहकार्य करीत आत्मसमर्पण करावे, बांधवांना-भगिनींना शांतता राखा!अशी नम्र विनंती नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केली आहे.
सामाजिक सौहार्द व शांतता पाळणारा तालुका म्हणून माहूरची ओळख आहे.अलीकडच्या काळात काही बोटावर मोजण्या इतक्या लोकांमुळे शहरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे प्रकार सुरू आहेत.त्यामुळे शहरातील शांतता भंग होत आहे.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.शहरातील शांतता भंग होऊ नये यासाठी सर्वपक्षीय व विविध संघटनेतील नागरिकांनी पुढाकार घेऊन सजग राहून प्रशासनाला सहकार्य करावे;जेणेकरून गुरुवार रोजी घडलेली अप्रिय व दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये!असे आवाहन करत समाज माध्यमावर नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओ मध्ये पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहे.