केवळ सेक्युलॅरिझमच राष्ट्रैक्य निर्माण करू शकतो -डॉ.जनार्दन वाघमारे

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.19.भीमराव राऊत लिखित व निर्मल प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ’भारतीय संविधान निर्मितीत डॉ.बी.आर. आंबेडकरांचे योगदान’ या ग्रंथाचे प्रकाशन हॉटेल विसावा पॅलेस, शिवाजीनगर,नांदेड येथे डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या हस्ते, डॉ. सोमनाथ रोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रा. दत्ता भगत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांनी आपल्या भाषणात संविधान संहितेतली तळातली सैधांतिक भूमिका विशद केली. बाबासाहेबांना संविधान सादर करताना हे पूर्णपणे माहीत होते की, अजून आपण पूर्णत्वाने एक राष्ट्र नाही आहोत.

त्यामुळे ही एक राष्ट्रीयत्वाची जाणवी प्रत्येक अनुच्छेदात कशी दडलेली आहे, हे विशद केले. या सर्वच अनुच्छेदातून केवळ सेक्युलॅरिझमच राष्ट्रैक्य निर्माण करू शकतो, हे ठाशीवपणे संहितेतून आपल्यापर्यंत पोहोचविले आहे.

हा गाभा रूजवताना त्यांनी आपल्या धर्ममताच्या स्वातंत्र्याला बाधा येणार नाही,हीही काळजी घेतली असल्याचे डॉ. वाघमारे म्हणाले.प्रमुख पाहुणे प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ.सोमनाथ रोडे यांनी अनुवाद ग्रंथाचा परिचय करून देताना संविधान संहितेत बाबासाहेबांचे नेमके काय योगदान आहे.

त्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतले आणि ते संविधान समितीच्या सदस्यांनाही किती जाणवले, हे यथार्थपणे सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. दत्ता भगत यांनी मी स्वतः कुठल्याही शिस्तबद्ध सामाजिक घटनांचे अभ्यासक नसल्यामुळे शब्दात दडलेले जे राष्ट्रभक्त मानवी मन आहे,ते सांगता येणे शक्य आहे, असे सांगत एक-दोन उदाहरणे दिली आणि समारोप केला.
प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले व लेखक भीमराव राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. जे.टी. जाधव यांनी अतिशय शिस्तबद्ध आणि आटोपशीर केले. शेवटी आभार प्रा.भास्कर पोहरे यांनी मानले.

यावेळी मा.आ.गंगाधर पटने, डॉ. सुरेश खुरसाळे,डॉ.गोविंद नांदेडे,डॉ.अशोक बेलखोडे, प्रा. भगवंत क्षीरसागर,प्रा.शेषराव मोरे,डॉ.अनंत राऊत,नरेंद्र नाईक,डॉ.प्रकाश मोगले, इंजि. शिवाजी पाटील,डॉ. भगवानराव अंजनीकर,संजय पाटील,प्रा.डॉ.एन.के.राऊत, ज्ञानेश वाकुडकर,अ‍ॅड. सी.आर.पंडित,सौ.सुमन भगत, महाजन (अधीक्षक, जीएसटी),महेश मोरे,नारायण शिंदे,पवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!