जालना – राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. मात्र चाळीस दिवसांत आरक्षण न मिळाल्यानं त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं होतं.
अखेर राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी नवव्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलं. त्यानी आता सरकारला आरक्षणानासाठी नवी डेडलाईन दिली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
मात्र दुसरीकडे या मागणीला ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध होत आहे. छगन भुजबळ यांनी देखील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देता येणार नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता ओबीसी समाजाकडून येत्या 17 नोव्हेंबरला जालन्यातील आंबडमध्ये महामोर्चाच आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला ओबीसी बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं आहे.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
छगन भुजबळ मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत, छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे जाताना अंतरवाली सराटी फाट्यावर त्यांच्या समर्थकांनी भुजबळ यांचं भव्य स्वागत केलं. यावेळी बोलताना ‘येत्या 17 तारखेला जालना जिल्ह्यातल्या अंबड येथे ओबीसींच्या महामोर्चाच आयोजन केलं असून, आमंत्रणाची वाट न पाहता मोठ्या संख्येने एकत्रीत या’ असं आवाहन छगन भुजबळ यांनी ओबीसी बांधवांना केलं आहे.
दरम्यान सरसकट मराठी समाजाला कुणबी प्रमाणपत्र देता येणार नसल्याचं देखील छगन भुजबळ यांनी यावेळी म्हटलं आहे. जरांगे पाटील यांनी देखील काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला होता.