नांदेड – नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडे नांदेड विभागातील गाळप हंगाम २०२३-२४ साठी २९ साखर कारखान्यांनी गाळप परवानासाठी अर्ज सादर केले होते. यात २१ खासगी तर आठ सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे,
परंतु या कारखान्यांना अद्याप गाळप परवाना मिळाला नाही. परवान्यापूर्वी कारखान्याने गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाचे पैसे भरण्याची सक्ती करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडून मिळाली.
नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडे नांदेड नांदेड विभागात परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. नांदेड विभागात मागीलवर्षी ३० साखर कारखाने सुरु झाले होते. यात १९ खासगी तर ११ सहकारी कारखान्यांचा समावेश होता.
चालू हंगाम २०२३-२४ या वर्षाचा गाळप हंगाम ता. १ नोव्हेबर पासून सुरु होत आहे. यासाठी विभागातील साखर कारखान्यांनी गाळप हंगामासाठी नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाच्या मार्फत राज्याच्या साखर आयुक्तांकडे गाळप परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत.
यात २१ खासगी तर आठ सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. यंदा एकूण २९ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज सादर केला आहे. परंतु शासनाने आदेश काढून कारखान्यांनी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाकडे मागील दोन वर्षाचे १७ रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम चार टप्यांत देण्याची सुविधा देण्यात आली आहे.
मागीलवर्षी गाळपासाठी अर्ज केलेले कारखाने
१) ट्वेंटीवन शुगर युनिट – १ २) विलास कारखाना -२ तोंडार, ३) रेणा कारखाना, ४) योगेश्वरी शुगर, ५) श्री तुळजाभवानी शुगर, ६) कपीश्वर शुगर, ७) श्री लक्ष्मी नरसिंह शुगर, ८) श्री रेणुका शुगर, ९) गंगाखेड शुगर, १०) श्री संत शिरोमणी मारोती महाराज, ११) एमव्हीके शुगर, १२) श्री सुभाष शुगर, १३) मांजरा कारखाना, १४) विलास यु -१ निवळी, १५) कुंटूरकर शुगर, १६) शिऊर शुगर, १७) जागृती शुगर, १८) ट्वेंटीवन शुगर यु-२, १९) ट्वेंटीवन शुगर यु-३, २०) टोकाई कारखाना, २१) पूर्णा कारखाना, २२) शेतकरी कारखाना, २३) ओंकार शुगर, २४) बळीराजा शुगर, २५) श्री साईबाबा शुगर, २६) भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना यु -१, २७) भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना यु -२, २८) सिद्धी शुगर, २९) शिवाजी सर्विस स्टेशन.