०७ तारखेपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. तेव्हा सरकारने २४ डिसेंबर येऊं देऊ नये.
राज्यात ज्या नोंदी सापडल्या त्याचा अहवाल सरकारने स्वीकारावा
माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी
माहूर : मराठा आरक्षणासाठी दिवसरात्र एक करत सरकारशी लोकशाही मार्गाने आंदोलन करत निकराची झुंज देत असलेले मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी आज माहूरगडावरील श्री रेणुकादेवीचे दर्शन घेत महापूजा,आरती करून “हे माते!मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी सरकारला सद्बुद्धी दे !” अशी प्रार्थना करत देवीला साकडे घातले.तर अस्मानी व सुल्ताना संकटाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना राज्यातील शेतकऱ्यांना सुखसमृद्धी दे! अशी देवीला प्रार्थना केली.दर्शनानंतर त्यांचे श्री रेणुकादेवी संस्थानकडून मातेचा प्रसाद देऊन विश्वस्त चंद्रकांत भोपी,दुर्गादास भोपी,मुख्य पूजारी भवानीदास भोपी, शुभम भोपी, समीर भोपी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मनोज जरांगे पाटील यांचे आज बुधवारी दि.०६ रोजी माहूर येथील सकल मराठा समाजाच्या नियोजनानुसार दुपारी १२ वाजता आगमन होणार होते. परंतु,त्यांचे माहूर येथे दुपारी अडीच च्या सुमारास आगमन झाले.सुरुवातीला केरळी फाटा लांजी बायपास वर त्यांचे सकल मराठा समाजाच्यावतीने सत्कार मुर्ती स्वरूपात वाजतगाजत जोरदार स्वागत करण्यात आले.त्यानंतर माहूर शहरातील टी-पॉइंट येथे जेसीबी मशीन वरुन पुष्पवृष्टी करत ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.तदनंतर प्रथम त्यांनी रेणुकागडावर जात मातेचे दर्शन घेतले.त्यानंतर त्यांनी दत्तशिखर येथे जाऊन प्रभु दत्तात्रेय यांचे सुद्धा मनोभावे दर्शन घेतले.
दर्शनानंतर नियोजित सभा स्थळी येऊन सकल मराठा समाजाच्यावतीने सत्कार स्विकारुन उपस्थित समाज समुहास मार्गदर्शन केले.
यावेळी मातेचे दर्शन व आशिर्वाद घेऊन प्रसन्न झालेल्या पाटील यांनी रेणूका मातेच्या आशीर्वादाने आम्ही पुन्हा मराठा आरक्षण लढा लढण्यासाठी सज्ज झाल्याचे ठणकावून सांगितले.दरम्यान,उद्यापासुन (दि.०७) नागपूर येथे राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून,सरकारने २४ डिसेंबर ही आम्ही दिलेली मराठा आरक्षणाची डेड लाइन देऊ नये असे स्मरण करून दिले.राज्यात ज्या ३५ लाख नोंदी शासन दरबारी सापडल्या असून,त्याचा अहवाल सरकारने स्वीकारावा आणि या दोन दिवसातच मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढावा अशी सरकारला विनंती यावेळी उपस्थित समाजसमुहाशी संवाद साधताना केली.मराठा आरक्षणाचा विषय आता शासनाशी आरपारची लढाईवर आला असून,मराठा समाजाच्या नागरिकांच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी हा लढा आहे.कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही.माझ्या श्वासातश्वास असे पर्यंत मी आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही !असा निर्धार त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.