आदर्श पत्रकार संघ पुरस्कारांची घोषणा; लातूर विभागातून माहूर तालुका पत्रकार संघ ठरला पुरस्काराचा मानकरी!

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

माहूर तालुका प्रतिनिधी/ विजयसिंह हजारी

माहूर : मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराची आज दिनांक ०३ नोव्हेंबर रोजी मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी घोषणा केली आहे.त्यात लातूर विभागातून माहूर तालुका पत्रकार संघ पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.येत्या २०२४ या नवीन वर्षातील १३ जानेवारी रोजी राज्यस्तरीय पत्रकार मेळाव्यात माहूर येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख यांनी दिली आहे.

मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न राज्यातील अनेक जिल्हा आणि तालुका पत्रकार संघ आपआपल्या कार्यक्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत आपल्या धारदार लेखणीने निर्भीड लिखाणातून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मजबूत करण्यासाठी कार्य करीत असतात.तसेच मराठी पत्रकार परिषदेचे सर्व उपक्रम यशस्वीपणे राबवत असतात.अशा तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांचा राज्यस्तरावर गौरव करण्याचा निर्णय परिषदेने घेतला.त्यानुसार गेली दहा वर्षे मराठी पत्रकार परिषद हे पुरस्कार देत आली आहे.मराठी पत्रकार परिषदेचे भूतपूर्व अध्यक्ष “संध्या” कार वसंतराव काणे आणि “संचार” कार रंगा अण्णा वैद्य यांच्या नावाने हे पुरस्कार दिले जातात.
यावर्षीच्या पुरस्कारांची आज रविवारी घोषणा करण्यात आली.
त्यात नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुका पत्रकार संघाची लातूर विभागातून आदर्श तालुका पत्रकार संघ म्हणून निवड करण्यात आली आहे.

माहूर तालुका पत्रकार संघ हा उपक्रमशील पत्रकार संघ असून, वेळोवेळी विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपत समाजीक जागृतीचे कार्य करीत आले आहे.माहूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने कोविड मध्ये आई वडिलांचे छत्र हिरावलेल्या ५५ अनाथ विद्यार्थ्यांना दत्तक घेत त्यांना शालेय साहित्य दफ्तर, वह्या,पेनी,आणि खाऊचे वाटप दिनांक १२ जानेवारी २०२२ रोजी करण्यात आले होते.तर ०६ जानेवारी २३ रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून गोर गरीब गरजूंना उबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.याशिवाय नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील दिवंगत पत्रकाराच्या कुटुंबाला १५ मार्च २०२३ रोजी रोख आर्थिक मदत करण्यात आली.
अलीकडेच माहूर तालुका पत्रकार संघाचे सदस्य भीमराव पूनवटकर यांचे अकाली निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनाही रोख आर्थिकस्वरुपाची मदत करण्यात आली.०६ जानेवारी २२ रोजी स्थानिक धरमवाडी जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण,ट्री गार्ड भेट दिले व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले होते.

वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची दखल घेत मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख,विश्वस्त किरण नाईक,अध्यक्ष शरद पाबळे,कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,सरचिटणीस मन्सूरभाई शेख,कोषाध्यक्ष विजय जोशी,राज्य प्रसिध्दी प्रमुख संदीप कुलकर्णी,डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर,नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गवर्धन बियाणी यांनी माहूर तालुका पत्रकार संघाची आदर्श पत्रकार संघ म्हणून निवड केली आहे व माहूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसानी यांचेसह सर्व पदाधिकारी,सदस्यांचे अभिंनदन केले आहे.सन्मानचिन्ह,शाल,
श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.मिळालेल्या या पुरस्काराबद्दल तालुक्यासह,
जिल्हाभरातील विविध राजकीय पक्षाचे नेते,पुढारी,पदाधिकारी,
पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसानी यांचेसह पदाधिकारी व सर्व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन करुन निरंतर यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!