मोदींची विकासाची गॅरंटी,देश भाजपाच्या पाठीशी
माहूर तालुका प्रतिनिधी/विजयसिंह हजारी
माहूर – तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेला बंपर विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रती लोकभावनांचे मतदानरुपी प्रतिबिंब असून,२०२४ च्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम असून,विजयाची नांदी ठरणारा आहे.असे प्रतिपादन भाजपाचे हिंगोली लोकसभा प्रभारी तथा हिंगोली लोकसभेसाठी भाजपतर्फे उमेदवारीचे प्रबळ दावेदार रामदास पाटील सुमठाणकर यांनी केले.
देशातील मध्यप्रदेश,राजस्थान,
छत्तीसगढ,तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल घोषित झाले.त्यात मध्यप्रदेश,राजस्थान व छत्तीसगढ या तीन राज्यात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले.
त्यानिमित्ताने हिंगोली लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विजयाचा आनंदोत्सव पेढे,मिठाई एकमेकांना भरवत व वाटत प्रचंड
जल्लोषात साजरा करण्यात आला.या विजयाबद्दल आपल्या मनातील उत्कट भावना हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी दै.तरुण भारतशी बोलताना उत्स्फूर्त आणि दिलखुलासपणे व्यक्त केल्या.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजयी कामगिरी करण्यासाठी भाजपा नेत्यांनी,कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले.पक्षाने बहुतांश निवडणुका या नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखाली लढवलेल्या आहेत. निवडणुकांतही मोदी हेच केंद्रस्थानी होते.केंद्रात आणि राज्यांत एकाच पक्षाचे सरकार असेल,तर राज्याचा विकास अधिक वेगाने होतो,असे राजकीय समिकरण समजण्यात येते जे कि,जनतेला सुद्धा पटल्याचे या निकालावरून स्पष्ट होते.असे सुमठाणकर म्हणाले.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक ही आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रंगीत तालीम म्हणून पाहिली गेली असून,या निवडणुका जिंकल्यानंतर लोकसभा निवडणुकीचा विजय भाजपासाठी सोपा असेल.याच कारणामुळे भाजपाने लोकसभा निवडणूक लक्षात ठेवूनच प्रचार केला आणि त्यासाठी मोदी यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले.
मोदी यांनी नारी शक्तीसाठी सर्वाधिक काम केले असून,नारी शक्तीचा विकास हा भाजपाच्या विकास मॉडेलचा स्तंभ आहे.
महिलांनी भाजपाला भरपूर आशीवार्द दिला.जी आश्वासनं दिली ती शत प्रतिशत पूर्ण करू, ही मोदींची गॅरंटी आहे आणि मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी असे दस्तुरखुद्द मोदी यांनी ठणकावून सांगितले असल्याने ती भाजपाची हमखास गॅरंटी असल्याचे सुमठाणकर म्हणाले.
भाजपाला सर्वाधिक विधानसभेच्या जागा असलेली तीन मोठी राज्ये मिळाली आहेत. त्यामुळे लोकसभेचा प्रवास सोपा झाला आहे.भाजपाने दहा वर्षांत गरिबांना,शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ
दिला आहे.भाजप कुटुंब,
समाजात महिलांची आर्थिक भागीदारी,रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी निरंतर काम करत आहे,हे महिला पाहत आहेत.नारी शक्तीचा विकास हा भाजपचा विकास मॉडेलचा स्तंभ आहे.म्हणूनच या निवडणुकीत महिलांनी भाजपाच्या विजयाची जबाबदारी आपल्या हातात घेतली होती.परिणामी भाजपाला मतदानरुपी भरपूर आशीर्वाद दिल्याचे सुमठाणकर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की निवडणूक निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे कि, देशातील तरुणांना विकास हवा आहे.आज देशातील तरुणांमध्ये विश्वास वाढत आहे.
भाजपच आपली आकांक्षा समजत असून,आपल्यासाठी काम करत आहे,हे तरुणांना वाटतं.भाजपचं सरकार युवकांचं कल्याण पहाणारं सरकार आहे. तरुणांना नवीन संधी देणारे आहे, असं या तरुणांना वाटतं आज देशातील आदिवासी समाजही आपली मते उघडपणे मांडत असून,ते आज विकासासाठी आशावादी आहेत व ही आशा केवळ आणि केवळ भाजप सरकारच पूर्ण करू शकते,हे त्यांना समजले आहे.डबल इंजिन सरकारचा संदेश भाजपा कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवला.त्याचा फायदा आज होत असल्याचे सुमठाणकर यांनी म्हटले.
तीन राज्यातील निकालाचा ट्रेण्ड हा महाराष्ट्रातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सुद्धा कायम राहणार असून,आगामी २०२४ ला हिंगोली लोकसभा भाजपा विक्रमी मताने जिंकणार! असा ठाम विश्वास हिंगोली लोकसभा मतदारसंघात अहोरात्र फिरत घरोघर,दारोदार जाऊन जनतेच्या भेटी घेत संपर्क साधत असलेले भाजपतर्फे हिंगोली लोकसभेसाठी उमेदवारीचे प्रबळ दावेदार असलेले रामदास पाटील सुमठाणकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.