माहूर तालुका प्रतिनिधीवि / जयसिंह हजारी
माहूर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निम्न पैनगंगा उर्फ चिमटा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ-मराठवाडा मध्ये किनवट माहूरचे आमदार भीमराव केराम यांनी सकारात्मक चर्चा घडवून आणली असता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा बैठक लावण्याचे आश्वासन दिल्याने आता या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून,धरणाच्या बाबतीत निर्णायक तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पैनगंगा नदी काठच्या तब्बल ९५ गावच्या गावजमीनी व शेतजमीनी पाण्याखाली जात असल्याने शासनाविरोधात प्रकल्पग्रस्तांचा तीव्र विरोधातून गेली २५ वर्षांपासून प्रदिर्घ लढा सुरू आहे.प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने व्यापक आंदोलनाच्या माध्यमातून रान उठविलेल्या निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ- मराठवाडा तर्फे निम्न पैनगंगा प्रकल्प रद्द करून पैनगंगा नदी पात्रात उच्च पातळी बंधारे बांधा या मागणीसाठी गेल्या अठरा दिवसांपासून साखळी उपोषण व दहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे.त्याच अनुषंगाने आज गुरुवार दि.१४ डिसेंबर रोजी धरणविरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी यांची किनवटचे आमदार भीमराव केराम यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. चर्चेमध्ये फडणवीस यांनी ह्या प्रकल्पाबाबतची संपूर्ण माहिती घेऊन या प्रकल्पाबद्दल पुन्हा एकदा आपण बैठक लावून सविस्तर चर्चा करू असे आश्वासन समितीला दिले तथा चालू असलेले आमरण उपोषण व साखळी उपोषण मागे घेण्याबाबत सुचित केले असल्याचेही समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या आजच्या बैठकीमध्ये धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप,प्रसिद्धी प्रमुख तथा संघटक सचिव मुबारक तंवर,कोषाध्यक्ष प्रल्हादराव गावंडे,प्रल्हाद पेंदोर,निळकंठ कातले हे उपस्थित होते.