जिल्हा प्रतिनिधी/विजयसिंह हजारी
नांदेड – पाचशे वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला मूर्त स्वरूप येत असल्यामुळे “२२ जानेवारी २०२४” हा दिवस भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार असून,भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिरातील श्री रामलला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पाहण्यासाठी व त्या दिवशी दिवाळी साजरी करण्यासाठी सोमवारी २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी ! अशी मागणी केंद्र व राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासनाकडे धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.*
२२ जानेवारी रोजी शरयू नदीच्या काठी वसलेल्या अयोध्येच्या पावन नगरीत प्रभू श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापणाचा सोहळा संपन्न होणार आहे.आजच्या घडीला संपूर्ण विश्वाचे लक्ष अयोध्या तिर्थक्षेत्राकडे वेधले गेले आहे.आपल्याला शेकडो वर्षांपासून ज्या अनमोल क्षणाची प्रतिक्षा होती ती वेळ आता अगदी जवळ आली आहे.आणि म्हणूनच जस-जशे प्रभु श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणाची वेळ जवळ येत आहे तस-तशी रामभक्तांची आतुरता देखील अधीकच वाढत शिगेला पोहचली आहे.
उत्तर प्रदेशात वसलेल्या अयोध्येस ‘रामनगरी’ म्हणून ओळखले जाते.त्यालाच इतिहासात “कोशल जनपद” असे देखील संबोधले गेले आहे. अयोध्येतून शरयू नदी प्रवाहीत होत असल्यामुळे त्या नदीस देखील एक विशेष असे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे.
इक्ष्वाकू, पृथु, मांधाता, हरिश्चंद्र, सागर, भगीरथ, रघु, दिलीप, दशरथ आणि राम यांसारख्या अनेक प्रसिद्ध राजांनी कोसल देशाची राजधानी अयोध्येतून राज्य केले. त्यांच्या राजवटीत राज्याची शान शिगेला पोहोचली आणि राम हे राज्याचे प्रतीक बनले. सरयू नदीच्या पूर्वेला वसलेले अयोध्या शहर प्राचीन काळातील अवशेषांनी भरलेले आहे.
दि.५ ऑगस्ट २०२० रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम जन्मभुमीचे भुमीपूजन केले तो अलौकिक क्षण सर्व भारतीयांसाठी अपार आनंदाचा व उत्तुंग स्वाभीमानाचा होता. कारण एका योग्य व्यक्तिच्या नेतृत्वामुळेच ह्या शुभ कार्याची खरी सुरुवात झाली.प्रभू श्रीराम मंदिराच्या सुनियोजित वास्तूचे स्वरुप हे अतिशय भव्य-दिव्य असणार आहे.ज्यात प्रार्थना विभाग,व्याख्यान विभाग, शैक्षणिक सुविधा विभाग,संत निवास,संग्रहालये आदी स्वतंत्र व सुटसुटीतपणाने मुबलक सुविधा याठिकाणी उपलब्ध राहणार आहेत.प्रभू श्रीराम मंदिराचे वास्तू कार्य पूर्ण झाल्यानंतर विश्वातील सर्वात मोठ्या तिसऱ्या क्रमांकावरील हिंदु मंदिर राहणार आहे.
जेव्हा रावणास पराभूत करुन प्रभू श्रीराम लंकेतून अयोध्येस परतले होते,तेंव्हा त्यांच्या स्वागतासाठी दिवाळी साजरी केली गेली होती.ती प्रथा जपत शेकडो वर्षांपासून आपण दरवर्षी सण म्हणून दिवाळी साजरी करतो अगदी त्याच प्रमाणे प्रभू श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापणेच्या दिवशी दि.२२ जानेवारी २०२४ रोजी दिवाळी व दिपोत्सव साजरा केला जाणार आहे.त्या दिवशी प्रत्येक मंदिरात पूजन,महाआरती,भजन,किर्तन,यासोबतच हनुमान चालीसा,
रामरक्षा स्त्रोत,श्रीराम स्तुती ई.चे पठण व श्रीराम नामाचेच जप केले जाणार आहे.विविध सेवाभावी,सामाजिक,धार्मिक संघटना आणि मंदिरांतर्फे जय्यत तयारी करून यासाठी कामाला लागले आहेत.

प्राण प्रतिष्ठापणेच्या संध्याकाळी सर्वत्र घरोघरी दिप प्रज्वलित करून दिपोत्सव देखील साजरा केला जाणार आहे.एकंदरीत हा दिवस भारतासह जगभरात प्रचंड उत्साहात साजरा केला जाणार आहे.त्यामुळे ही अमुल्य वेळ साधण्यासाठी या अद्भुत, अभूतपूर्व,अलौकिक धार्मिक सोहळ्यात प्रत्यक्ष अथवा आपल्या स्थानिक मंदिरात उपस्थिती लावून आपला सहभाग नोंदवत सोहळा पाहण्यासाठी व त्या दिवशी दिवाळी साजरी करण्यासाठी २२ जानेवारी या विशेष अशा ऐतिहासिक दिवशी शासनाने सार्वजनिक सुट्टी अथवा स्थानिक सुट्टी जाहीर करावी! अशा मागणीचे निवेदन केंद्र व राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडे नांदेड येथील भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य,धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर,प्रा.अवधेशसिंग अशोकसिंग सोळंकी यांनी पाठविले आहे.