मुंबईः मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील हे येत्या २० जानेवारीपासून मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. मराठा समाजाच्या वतीने आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. परंतु याच मैदानाच्या मागणीवर ओबीसी समाजदेखील ठाम आहे.
त्यामुळे मैदानासाठी मराठा-ओबीसी संघर्ष होऊ शकतो.मराठा समाजाच्या वतीने आझाद मैदान, बीकेसी मैदान आणि शिवाजी पार्कवर आंदोलनाची तयारी सुरु करण्यात आलेली आहे. मागच्याच आठवड्यात मराठा शिष्टमंडळाने तिन्ही मैदानांची पाहाणी केली. मात्र आझाद मैदानासाठी ओबीसी समाज आग्रही आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी आधीच आझाद मैदानासाठी पोलिसांना पत्र दिल्याची माहिती आहे.
आता पोलिस काय भूमिका घेतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. तीन कोटी लोक मुंबईत येतील, असा दावा मराठा समन्वयकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे तिन्ही मैदानं आवश्यक असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र ओबीसी समाजाच्या नेत्यांनीही २० तारीखेला आंदोलनाची हाक दिली आहे.
मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे. सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळावं, ही एक प्रमुख मागणी पुढे आलेली आहे. त्यामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला आहे.
दरम्यान, गुरुवारी शिर्डी येथे कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलताना शरद पवारांनी येत्या चार ते आठ दिवसांमध्ये सरकार आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं होतं. सरकारनेच जरांगेंना लेखी दिल्यामुळे अडचण निर्माण केल्याचंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.