माहूर व किनवट तालुक्यात ०४ ते ११फेब्रुवारी दरम्यान भाजपाचे गांव चलो अभियान;०१ रोजी कार्यशाळा!

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी

माहूर – आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारांची यशोगाथा तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या सूचनेने ‘गावं चलो अभियान’सुरू करण्यात येत आहे.ज्यामध्ये ०४ ते ११ फेब्रुवारी या काळात देशभरात हा अभियान राबवण्यात येणार असून ०७ लाख खेड्यांपर्यंत पोहोचून भाजपा कार्यकर्ते आठवडाभर आपला पूर्ण वेळ देणार आहेत.माहूर व किनवट ह्या दोन्ही तालुक्यात देखील हे अभियान राबविण्यात येणार असून,त्यासाठी १ फेब्रुवारी रोजी सर्व प्रवासी कार्यकर्त्यांसाठी या
अभियान संदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
त्यासाठी नांदेड उत्तर जिल्हा सहसंयोजक म्हणून अविनाश राठोड यांच्याकडे किनवट व माहूर तालुक्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे.तर किनवट तालुका अध्यक्ष बालाजी आलेवार व माहूर तालुका अध्यक्ष कांतराव घोडेकर यांची मंडळ संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.अशी माहिती जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा सहसंयोजक भाजपा नांदेड उत्तर ॲड.अविनाश गोविंद राठोड यांनी दिली आहे.

२०१४ ते २०२४ या दहा वर्षाच्या काळात देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने देशात सर्व क्षेत्रात प्रचंड गतीने विकास केला आहे. गरीब कल्याण,महिला सशक्तिकरण,देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा अशा अनेक क्षेत्रात मोदी सरकारने मोठी कामगिरी करत आंतरराष्ट्रीय पातळीवरील देशाचे नाव उंचावले आहे.भाजपा शासित अनेक राज्य सरकारनेही उत्तम साथ देत आपापल्या राज्यात मोठा विकास केला आहे.

या अभियानात भाग घेणाऱ्या कार्यकर्त्यांना “प्रवासी कार्यकर्ते” म्हणून संबोधण्यात येणार आहे. प्रवासी कार्यकर्ते प्रत्येक गावा खेड्यात जाऊन २४ तास तिथे राहणार असून,मोदी सरकारने केलेल्या महत्त्वाच्या कामगिरी बद्दल व कल्याणकारी योजनांची माहिती देणे,सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची भेट घेणे,गावातील नवीन मतदारांपासून ते सर्व वरिष्ठ व्यक्तींना भेटून चर्चा करणे असे अनेक उपक्रम हाती घेऊन प्रत्येक माणसाला भारतीय जनता पक्षाशी जोडण्याचे काम करण्यात येणार आहे.

हे अभियान यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भाजपाने जिल्हा अभियान समिती,तालुका अभियान समिती आणि गाव संयोजक अशी नवीन टीम तयार केली आहे.ज्यात भाजपातील सर्व दिग्गज नेत्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे.मुंबई भाजपा प्रदेश कार्यालय येथे देशाचे संघटन मंत्री शिव प्रकाश व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ‘गाव चलो अभियान’संदर्भात सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांची नुकतीच कार्यशाळा पार पडली.

नांदेड जिल्ह्यात मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे,प्रदेश उपाध्यक्ष आमदार गजानन घुगे, प्रदेश समन्वयक प्रवीण साले,
नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समितीचे काम जोरात सुरू आहे.तसेच जिल्हा पातळीवर व तालुका पातळीवर या अभियानाची कार्यशाळा आयोजित करून पक्षातील वरिष्ठ नेत्यांमार्फत या अभियानाशी जोडलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचे कार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.

नांदेड उत्तर जिल्हा सहसंयोजक म्हणून अविनाश राठोड यांच्याकडे किनवट व माहूर तालुक्याची या दोन्ही तालुक्यात ०१फेब्रुवारी रोजी सर्व प्रवासी कार्यकर्त्यांसाठी या अभियान संदर्भात कार्यशाळा घेण्यात येणार असून ०४ते ११फेब्रुवारी दरम्यान दोन्ही तालुक्यात अभियान राबविण्यात येणार आहे.११फेब्रुवारी हा पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृतिदिन असल्यामुळे हे अभियान त्यांच्या स्मृतीला समर्पित करण्यात येणार आहे.अशी माहिती ॲड.अविनाश राठोड, जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा सहसंयोजक भाजपा नांदेड उत्तर यांनी दिली आहे.

Share This Article
error: Content is protected !!