माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी
माहूर- विविध सेवा कार्याबद्दल आतापर्यंत तब्बल ८५ पुरस्कार प्राप्त करून पुरस्काराच्या शतकाच्या दिशेने निघालेल्या गोरगरिबांचा सेवेकरी म्हणून राज्यातच नव्हे तर देशभरात ओळखले जाणारे नांदेड येथील एक सेवाधर्मी विलक्षण व्यक्तीमत्व ॲड.दिलीप ठाकूर यांना आता आणखी एक पुरस्कार जाहीर झाला आहे.रविवार दि.४ फेब्रुवारी २०२४ रोजी नांदेड येथे होणाऱ्या संत नामदेव मराठी साहित्य तथा ग्रंथ संमेलनात मान्यवरांच्या हस्ते धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांना ‘भक्त नामदेव अखंड सेवावृत्ती पुरस्कार ‘ देण्यात येणार असल्याची घोषणा संयोजक तथा जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांनी केली असून,यामुळे आता ठाकूर यांच्या एकूण पुरस्कारांची संख्या ८६ वर पोहचली असल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.*
सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात अग्रगण्य ठरलेल्या नांदेड येथील नानक साई फाऊंडेशन व महाराष्ट्र शासन,साहित्य व संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने दि.४ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे संत नामदेव मराठी साहित्य तथा ग्रंथ संमेलन आयोजित करण्यात आले आहे. पंजाबातील घुमान येथे संपन्न झालेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या धर्तीवर संत नामदेव महाराज यांच्या ७५४व्या जन्मशताब्दी निमित हे संमेलन नांदेडच्या गुरुनगरीत भरविले जात आहे.या संमेलनात संत नामदेव महाराज यांचे साहित्य व त्यांची वाणी,विचार याबाबत विचारमंथन,चर्चा,व्याख्यान, ग्रंथदिंडी,कवीसंमेलन आणि नानक साई फाऊंडेशनच्या पुरस्करांचे वितरण आदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
आतापर्यंत १४ वर्षात ८ लाखांपेक्षा जास्त जेवणाचे डबे गरजूंना वाटप करणारे धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी समाजसेवेमध्ये एक अनोखा पायंडा पाडलेला आहे. वर्षभरातून एक नव्हे दोन नव्हे तर ८५ उपक्रम ते नांदेडमध्ये घेतात.त्यात प्रामुख्याने…
रस्त्यावर फिरणाऱ्या वेड्या लोकांना दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी एकत्र करून त्यांची दाढी-कटिंग करण्यात येते.त्यानंतर स्वच्छ पाण्याने अंघोळ घालून नवीन कपडे व शंभर रुपये बक्षीस देण्याचा आगळावेगळा ‘कायापालट’ हा उपक्रम गेल्या ४० महिन्यांपासून सुरू आहे.
अन्न वाया जाऊ नये तसेच नांदेड शहरात कोणीही उपाशी राहू नये यासाठी’ भाऊचा माणुसकीचा फ्रिज’ ठेवण्यात आला आहे. गेल्या १५ महिन्यांपासून अखंड दररोज किमान ४० ते १२० जेवणाचे डबे या फ्रिजमध्ये ठेवण्यात येतात.
५ वर्षांपासून दरवर्षी हिवाळ्यात ४० मध्यरात्री फिरून रस्त्यात कुडकुडत झोपलेल्या बेघर नागरिकांना २ हजारांहून जास्त ‘ब्लॅंकेटचे वाटप’ त्यांच्या मार्फत करण्यात येत आहे. पावसाळ्यात ‘कृपा छत्र’ या उपक्रमा अंतर्गत आतापर्यंत चार वर्षात आठ हजारांपेक्षा जास्त छत्र्यांचे वाटप करण्यात आले आहे.
उन्हाळ्यात अनवाणी फिरणाऱ्या गोरगरीब व्यक्तींसाठी ‘चरण सेवा’ या उपक्रमा अंतर्गत चप्पल (पादत्राणे) वाटप करण्यात येते.
देशातील सर्वात मोठे कवी संमेलन ‘नरेंद्र-देवेंद्र महोत्सव’ गेल्या वीस वर्षांपासून दिलीपभाऊ घेत असतात.या कार्यक्रमाला लाखो रसिक रात्रभर उपस्थित राहतात.’रक्तदान हे श्रेष्ठदान’ म्हटले जाते स्वतः४२ वेळा रक्तदान करून ५ हजार ६०० पेक्षा जास्त रक्ताच्या बाटल्या दिलीप ठाकूर यांनी संकलीत केलेल्या आहेत.नांदेड मध्ये कोरोना लस देण्यास सुरू झाली त्या दिवसा पासून संपेपर्यंत ९०१ दिवस दररोज दवाखान्यात त्यांनी ‘मास्क,सॅनिटायझर,बिस्किट व पाण्याची बॉटल वितरीत’ केली आहे.
‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात हजारो तिरंगे झेंडे त्यांनी मोफत वितरित केले आहेत.’कश्मीर फाइल्स,केरळ स्टोरी’ यासारखे समाजातील ज्वलंत विषयावरील चित्रपट शेकडो मुलींना ‘मोफत’ दाखवून त्यांनी जनजागृती केली आहे. गेल्या २२ वर्षापासून अमरनाथ सह इतर धार्मिक यात्रा काढून हजारो ज्येष्ठ नागरिकांना किफायतशीर दरात ‘देवदर्शन’ घडवले आहे.’पाऊस दिंडी,चालण्याच्या भव्य स्पर्धा,स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण,विविध पदयात्रा शयासारखे अनेक विविध उपक्रम’ दिलीपभाऊ हे नियमित राबवीत असतात.
त्यामुळे त्यांच्या ह्या प्रदिर्घ अखंड मानवसेवेची दखल घेऊन त्यांना ”भक्त नामदेव अखंड सेवावृत्ती पुरस्कार ” देण्यात येणार असल्याची माहिती पंढरीनाथ बोकारे यांनी दिली आहे.