नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ राहुल कोलते
नांदेड – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्यात आल्याचे पत्र तीनही पक्षांच्या संमतीने काढण्यात आले.
प्रकाश आंबेडकर यांनीही त्याला दुजोरा दिला असला तरी जागावाटप अद्याप ठरलेले नाही, असे म्हणत संभ्रम निर्माण केला. दुसरीकडे वंचित सोबत आल्यामुळे राज्यात महाविकास आघाडीची ताकद वाढणार आणि त्यांचे खासदार सर्वाधिक निवडून येणार, असे दावे केले जात आहेत.
नांदेड चा विचार केला तर जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि महायुती हे दोघेही भक्कम आहेत. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेत चुरशीच्या लढती पहायला मिळणार आहेत. आता यात नेमकं बाजी कोण मारणार? याच्या चर्चा रंगल्या आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघात नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, भोकर, मुखेड, देगलूर, नायगाव या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यातील तीन मतदारसंघ काँग्रेसकडे तर दोन भाजप व एक शिवसेना शिंदे गटाकडे आहे.
गेल्या निवडणुकीत तिरंगी लढतीत भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर हे विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेच्या अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. भोकर, नांदेड दक्षिण, देगलूर या तीन मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. भोकर विधानसभा मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांना पाच हजारांचे मताधिक्य मिळाले होते. पण लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण 98 हजारांच्या माताधिक्याने निवडून आले होते.
काँग्रेसला हे मताधिक्य टिकवावे लागणार आहे. नांदेड उत्तर मध्ये 30 हजारांचे तर दक्षिण मतदारसंघात पाच हजारांचे मताधिक्य काँग्रेसला मिळाले होते. भाजपकडे नायगाव व मुखेड हे दोन मतदारसंघ तर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे आहे. गेल्या निवडणुकीत मुखेडमध्ये 36 हजार, नायगाव 20 हजार तर देगलूरमधून 15 हजारांचे मताधिक्य मिळाल्याने चिखलीकरांचा विजय झाला होता. तिन्ही मतदारसंघात विद्यमान आमदरांनी विकासकामांना गती दिली आहे.