नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – आगामी होऊ घातलेल्या २०२४ च्या नांदेड लोकसभा मतदारसंघाची विविध पक्षांकडून चाचपणी सुरू असून शिवसेना (उबाठा) जेष्ठ नेते माजी आ.रोहिदास चव्हाण यांचे नाव चर्चेत असून त्यांच्या नावाला सर्वाधिक पसंती असून नांदेड लोकसभेसाठी त्यांची उमेदवारी पक्की असल्याचे बोलले जात आहे.
हिंदू हृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत घडलेलं व्यक्तीमत्व म्हणून नोंद असलेले जेष्ठ शिवसैनिक असलेले व ज्यांनी शिवसेनेच्या प्रारंभीच्या काळात जिल्हाभरात सेनेची पाळेमुळे घट्ट रोवून तत्कालीन विरोधी पक्षांची दमछाक केली असल्यामुळे अजूनही तोच दबदबा तीच वचक तीच भीती सर्व विरोधी पक्षाना आहे. म्हणुन नांदेड जिल्ह्यातून भाजपाचे नामोहरम करण्यासाठी नांदेडचे पहिले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवसेनेचे जेष्ठ नेते माजी आ. रोहिदास चव्हाण यांच्या नावाची चर्चा जोरदारपणे होत आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघातील कानाकोपऱ्यातील संपूर्ण खडानखडा माहिती असलेला एक जुना जाणता नेता म्हणून त्यांची नोंद वरिष्ठांकडे आहे. पुर्वीपासून वारकरी संप्रदायाची ध्वजा खांद्यावर घेऊन संस्कृती टिकून ठेवण्यासाठी धार्मिक, सांस्कृतिक कार्यात नेहमीच असलेला सहभाग महत्त्वाचा मानला जात आहे. माजी आ चव्हाणांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून अनेकदा सर्व स्तरातील जातीधर्माच्या लोकांना अनेकदा संधी दिली. कधी सुडाचे राजकारण केले नाही.सद्य स्थितीतील राजकारण्यांसारखे कधी बेगडी रुप धारण केले नाही. सामाजिक दृष्टीकोन समोर ठेवून ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करत वंचित घटकांना न्याय दिला. ही त्यांची जमेची बाजू म्हणून त्यांना जुने निष्ठावंत शिवसैनिक नांदेड लोकसभेसाठी गळ घालत आहेत.
सद्याचे सुडाचे राजकारण पाहून जनतेला निष्कलंक,चारित्र्य संपन्न,वारकरी संप्रदायाची आयुष्य भर ध्वजा खांद्यावर घेणारा सकल मराठा समाजाच्या मनातीला,अठरा पगड जातींना सोबत घेऊन चालणारा सर्व राजकीय पक्षातील भल्या भल्यांना घाम फोडणारा नेत्यांमधील कार्यकर्ता आज नांदेड लोकसभेसाठी हवा असल्याची जोरदार चर्चा नांदेड लोकसभा मतदार संघातील मतदरांतून होत आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघातील नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ,नांदेड उत्तर,भोकर,नायगाव,देगलूर, मुखेड हे विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्र असले तरी संपूर्ण नांदेड जिल्हा भरातून माजी आ. रोहिदास चव्हाण यांच्या नावाला जास्तीची पसंती दिली जात आहे.
तब्बल चार दशकांहून अधिकचा काळ जिल्हाभरात अजूनही शिवसैनिक, कार्यकर्ते टिकवून ठेवणं त्यांना जमलं. शहरासह खेड्यापाड्यातील माणसं सांभाळली शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते, शिवसैनिकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि अजूनही करत आहेत.
माणसं जपली म्हणून निष्ठेने काम करणारा विरोधकांना तोडीस तोड असलेला एकमेव आगामी लोकसभेचा चेहरा म्हणून शिवसेनेचे १५ वर्ष पाहिले सेनेचे जिल्हा प्रमुख,माजी आ.चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. कित्येक आले आणि कित्येक गेले परी संकट काळात ही ना डगमगता निधड्या छातीचा हा वाघ, बाळासाहेबांच्या विचाराराला व मातोश्रीला नेहमीच जपत, इमान राखणारा खंबीरपणे उभा हा वाघ..म्हणुनच जिल्ह्यासह मराठवाड्यातील विरोधक आजही चव्हाण यांची धास्ती घेतात.