हिमायतनगर प्रतिनिधी /बाबाराव जरगेवाड
हिमायतनगर – प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून एका १७ वर्षीय मुलीचा खून करण्यात आल्याची घटना येथील नेहरूनगर परिसरात घडली. प्रारंभी या घटनेला आत्महत्येचे स्वरूप देण्यात आले परंतु शुक्रवारी सकाळी झालेल्या उत्तरीय तपासणीत हा प्रकार उघड झाला.
हिमायतनगर येथील १७ वर्षीय अंकिता रामराव पवार या मुलीच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत तिचा दि.१ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. परंतु हा प्रकार लपविण्यासाठी या प्रकरणाला आत्महत्येचे स्वरूप देण्यात आले होते. यासंदर्भात शंका आल्याने मुलीचे शवविच्छेदन करण्यासाठी पोलिसांनी पंचनामा करून मुलीचे शव शासकीय रुग्णालयात पाठवले त्यानंतर हिमायतनगर येथील शासकीय रुग्णालयात शुक्रवारी सकाळी करण्यात आलेल्या शवविच्छेदनात मुलीच्या डोक्याला व ठिकठिकाणी गंभीर मारहाण झाल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यावरून या मुलीचा खून झाला असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. पोलीस घटनेचा तपास करत असून त्या मुलीच्या वडिलांनीच खून केला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हा प्रकार प्रेम संबंधातून घडला असावा असाही पोलिसांचा अंदाज असून परंतु या घटनेशी निगडित असलेल्यांची चौकशीनंतर सत्य समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. चौकशी करून दोषींविरूद्ध गुन्हा नोंदवू, असे हिमायतनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक नंदलाल चौधरी यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.