माहूरच्या रामगड किल्ला जतन व दुरुस्ती कामासाठी १३.८७ कोटीचा निधीला प्रशासकीय मान्यता!

abhishek bakkewad
4 Min Read
Spread the love

 

 

माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी

माहूर – महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने अनेक ऐतिहासिक वास्तूंचा मौल्यवान वारसा लाभलेल्यांपैकी एक मुख्य ठेवा असलेल्या परंतु,जतन व दुरुस्ती अभावी कालानुरूप पडझड होऊन नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माहूर किल्ला, अर्थात रामगड किल्ला या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन दुरुस्ती कामास मंजुरी दिली असून, दि. ०९ फेब्रुवारी रोजी या कामाच्या १३ कोटी ८७ लक्ष,२३ हजार ५०६ रुपये निधीला (वस्तु व सेवाकरासह) शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.त्यामुळे पौराणिक व धार्मिक स्थळ म्हणून ओळखला जाणाऱ्या माहूरचे ऐतिहासिक महत्त्व वाढून पर्यटन वाढीमुळे शासनाच्या महसूलातदेखील निश्चितच वाढ होणार आहे.

 

प्रसिद्ध तिर्थक्षेत्र माहूर हे राज्यातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री रेणुकादेवीचे एक शक्तीपीठ म्हणून भारतात सर्वदूर ओळखले जाते.पौराणिक व धार्मिक स्थळासह अनेक प्राचीन ऐतिहासिक मौल्यवान वास्तूंचा ठेवा याठिकाणी भरभरून लाभलेला

असल्याने माहूरचे ऐतिहासिक महत्त्व देखील अनन्यसाधारण आहे.याठिकाणी देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना ह्या ऐतिहासिक वास्तूंचे आकर्षण आपल्याकडे पर्यटनासाठी खुणवितात.त्यात प्रामुख्याने जवळपास ९ ते १० किलोमीटरपर्यंत लांब व विस्तिर्ण स्वरूपात पसरलेला तथा निसर्गरम्य दाट हिरवीगार वनराईची मनमोहक शालू पांघरलेला ‘रामगड किल्ला’होय. परंतु,दूर्दैवाने किल्ल्यासह अनेक ऐतिहासिक वास्तू व त्यातील वस्तू जतन व दुरुस्ती अभावी पडझड व झीज होऊन हा मौल्यवान ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.या गोष्टीची महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आता उशिरा का होईना परंतु, गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे.

 

माहूर किल्ला हा माहुर शहरापासून दक्षिणेस साधारणपणे ४ कि.मी. अंतरावर विस्तिर्ण स्वरूपात पसरलेला आहे. या किल्ल्यास रामगड किल्ला असेही म्हणतात. माहूर किल्ल्याची निर्मिती बहुधा राष्ट्रकुट काळात (इ. स. ९५१-९८२) मधे झाली असावी. पुढे हा किल्ला देवगिरीच्या यादवांकडे आल्यानंतर त्यांनी किल्ल्याच्या आतील तटाचे बांधकाम केले. यादवांच्या अस्तानंतर हा किल्ला काही काळ बहामनी सुलतानाच्या ताब्यात राहिला.औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दक्षिणेकडे असलेला हा प्रांत व त्यातील माहूर किल्ला हा हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात गेला.पुढे स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत हा किल्ला निजामाच्याच ताब्यात राहिला.

 

वर्ष २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये वित्त मंत्री यांनी शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनाकरिता निधी उपलब्ध करुन देण्याबावत घोषणा केली.त्यानुषंगाने या कामा करिता नियुक्त वास्तुविशारद नंदादीप डिझायनर्स अॅण्ड व्हॅल्यूअर, छत्रपती संभाजीनगर यांचेकडून तयार करण्यात आलेले रु.१३कोटी,८७लक्ष,२३हजार,५०६ इतक्या रकमेचे सविस्तर अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेकरिता सादर करण्यात आले होते.तदनूसार माहूर किल्ला हा राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन दुरुस्ती कामाच्या निधीचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यता देणेबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.तदनूसार दि.०९ फेब्रुवारी रोजी माहूर किल्ला, माहूर, ता. माहूर, जि. नांदेड या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन दुरुस्ती कामाच्या रु.१३ कोटी,८७ लक्ष, २३हजार ५०६ रुपये इतक्या निधीला(वस्तु व सेवाकरासह) या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

माहूर हे देवीचे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक,प्रभु दत्तात्रेय यांचे जन्म व निद्रास्थान,माता अनुसया,ॠषिमुनी अत्री यांचे आश्रमस्थळ धार्मिक व पौराणिक मंदिरांसह,मुस्लिम धर्मियांचे किंबहुना सर्वधर्मसमभावाचे प्रतिक म्हणून ओळखले जाणारे बाबा सोनापीर,बाबा लंगोटपीर दर्गा,भगवान गौतम बुद्धांचा भव्य पुतळा यासह पांडव लेणी,गुफा,अनेक विध मंदिरे,पवित्र तलाव तिर्थ,आश्रम, मठं व भाविक व पर्यटकांसाठी सर्वात विशेष आकर्षण असलेला रामगड किल्ला या व अनेक ऐतिहासिक वारसा लाभलेला मौल्यवान ठेवा असलेले धार्मिक, पौराणिक व ऐतिहासिक स्थळ आहे.परंतु,काळानुरूप हा मौल्यवान ऐतिहासिक ठेवा जतन व दुरुस्ती अभावी अनेक ठिकाणी पडझड होऊन नामशेष होऊन कालातीत होण्याच्या मार्गावर आहे.परंतु,हा ठेवा जपून ठेवण्यासाठी आता उशिरा का होईना पावले उचलली आहेत.त्यासाठी महाराष्ट्र शासन,संचालक, पुरातत्त्व व वस्तूसंग्रहालये संचालक, मुंबई यांचे पत्र जा.क्र.स्मारके/२०२४/३७०,दि.३१ जानेवारी २०२४ नुसार महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक विभाग शासन यांनी लक्ष घालून रामगड किल्ला जतन व दुरुस्तीसाठी ०९ फेब्रुवारी रोजी तब्बल १३ कोटी ८७ लक्ष, २३ हजार, ५०६ रुपये निधीला शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.त्यामुळे आता या ऐतिहासिक किल्ल्याचे रुबाबदार रुपडे अधिक खुलणार असल्याने पर्यटकांना जंगल सफारीसह ऐतिहासिक स्थळावर आनंद लुटण्याची मेजवानी ठरणार आहे.

Share This Article
error: Content is protected !!