नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – दि.१३.जिल्हातील माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची भूमिका गेल्या अनेक दिवसांपासून तळ्यात मळ्यात होती. परंतु सोमवारी सकाळपासूनच सोशल मिडिया व प्रसिद्धी माध्यमांवर अशोकरावांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या झपाट्याने पसरल्या आहेत.तर दुपारी ११ चव्हाणांनी वाजल्यापासूनच राजीनामा दिला नाही,केवळ अफवा असल्याची चर्चा होती . परंतु १ वा .अशोकराव चव्हाण यांनी पक्षप्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामा पाठवून काँग्रेस सदस्यपदाचा राजीनामा सादर केला.त्यानंतर लगेच विधानसभा अध्यक्षांकडे जाऊन आमदारकीचाही राजीनामा दिल्यामुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील अशोकराव चव्हाणांचे समर्थक अमरनाथ
राजूरकर,संतोष पांडागळे,संतोष मुळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामे सादर केले असल्याचे सांगितले जात आहे.मोदी सरकारने काढलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आल्यानंतर अशोक चव्हाणांनी भाजपबरोबर जाण्यासाठी काँग्रेसला अखेर शेवटचा रामराम ठोकल्याची चर्चा विरोधकांमध्ये होत आहे.
परंतु याबाबत राजकीय
विश्लेषक असे सांगतात की, राज्यसभेची निवडणूक नुकतीच लागली असून या निवडणुकीत अशोकराव चव्हाण यांची वर्णी लागणार असल्यामुळे चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपसोबत गेले आहेत. केवळ राज्यसभेवर नव्हे तर चव्हाणांना
मंत्रीपद देखील बहाल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. पण एकंदरीत नांदेड जिल्ह्यात मात्र हा मोठा राजकीय भूकंप आहे.
अनेक कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत . चव्हाणांच्या निष्ठावंतांनी भेट दिली असता तेथे शुकशुकाट दिसून आला . त्याचप्रमाणे राजेंद्रनगर येथील भास्करराव खतगावकर यांच्या निवासस्थानी शांतता दिसून आली.तर नांदेड येथील नव्या मोंढ्यातील माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यावर पुन्हा एकदा धर्मसंकट आले आहे.काही भाजप भाजप सोडून दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण आज चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यामुळे ओमप्रकाश पोकर्णा यांची पंचाईत झाली आहे.त्यांच्या
निवासस्थानीदेखील सन्नाटा पहायला मिळाला आहे.
जिल्ह्यात काँग्रेसचे तीन आमदार आहेत. त्यापैकी देगलूर – बिलोली विधानसभा मतदारसंघाचे
आमदार जितेश भाऊ अंतापूरकर,हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहन हंबर्डे भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहेत.यांनी अद्याप राजीनामे दिले नसले तरी त्यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तर दोन दिवसात राजकीय भूमिका स्पष्ट करतोय असं
अशोकराव चव्हाण म्हणाले पण मी जोपर्यंत मी काँग्रेस पक्षात होतो,तोपर्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे.
आता वेगळया पर्यायाचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. अजून मी कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही.
माझ्यासोबत कोण,कोण आहे, याबाबत मी कोणाशी संपर्क साधला नाही. कोणाशी बोललो नाही.प्रत्येकाचा स्वंतत्र निर्णय असतोच असे सांगत येत्या दोन दिवसात माझी राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहे. असे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी माध्यमांशी बोलतांना सांगीतले आहेत.
भाजपात चव्हाणांचे स्वागतच : खासदार चिखलीकर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजपात येतील ,असा दावा मी सतत करत आहे.
आता चव्हाण यांनी काँगेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे . यामुळे माझा दावा खरा ठरत आहे . ते भाजपात आल्यास त्यांचे स्वागतच आहे . पक्ष वाढीसाठी आणि मराठवाडयातील संघटनासाठी त्यांची मदत होईल , अशी प्रतिक्रिया भाजप खा . प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली.
मी चव्हाण साहेबांसोबत : आमदार जितेश अंतापुरकर
देगलूर -बिलोली : विधानसभेत घडलेल्या चालू घडामोडीवर देगलूरचे काँग्रेस आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांना आपण माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्यासोबत आहे. सध्या मी बाहेर आहे. बाकीचे नंतर यावर सविस्तर बोलेन,असे सांगीतले.
आमदार मोहन हांबर्डे :अशोक चव्हाण आमचे नेते,पण “मी काँग्रेस सोबतच”जनतेचा विचार घेऊन पुढील दिशा ठरवणार- आमदार मोहन हांबर्डे