नांदेड भाजपमध्ये आता अशोक पर्व भाजप खासदार चिखलीकर डेंजर झोनमध्ये…

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

नांदेड – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने नांदेड लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणच बदलण्याची चिन्हे आहेत. भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे संपूर्ण राजकारण चव्हाण यांना विरोध याच एका मुद्द्यावर सुरू होते.

आता तेच चव्हाण अधिक ताकदीने नांदेडमध्ये आपले वर्चस्व वाढवणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नांदेडमधूनच याची सुरुवात होऊ शकते. प्रताप पाटील चिखलीकरांच्या उमेदवारीला कात्री लागून चव्हाण भाजपमध्ये नव्याने ‘अशोक पर्व’ सुरू करू शकतात, अशी चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये नांदेडची जागा, पर्यायाने खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची जागा डेंजर झोनमध्ये होते. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर आता नांदेड लोकसभा उमेदवारी संदर्भातही वेगळा विचार केला जाऊ शकतो. गेल्या काही वर्षांत नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात अशोक चव्हाण – प्रताप पाटील चिखलीकर यांच्यातील वाद, आरोप-प्रत्यारोप राज्यात चर्चेचा विषय ठरलेले होते.

अशावेळी अशोक चव्हाण यांनी चिखलीकरांचा बंदोबस्त करण्याची अट भाजप प्रवेशाआधी नेतृत्वाला टाकली नसेल तर नवलच. आता याचा परिणाम महायुतीचा लोकसभा उमेदवार जाहीर करतानाच दिसून येतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचा सर्वाधिक त्रास हा चिखलीकरांना झाला असणार.

नांदेड भाजपमध्ये आता अशोक पर्व –

राज्यातील भाजचे नेतृत्व अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये घेण्यास उत्सुक होते, तेव्हा चिखलीकर त्यांच्यावर भाजपच्या दारात कशासाठी गेला होतात? भाऊसाहेब साखर कारखान्यासाठी दीडशे कोटींची थकहमी मिळवण्यासाठी हात पसरले का? असे म्हणत हिणवत होते. भाजपला चव्हाणांची गरज नाही तर त्यांनाच भाजपची गरज आहे, अशा चिखलीकरांनी दिलेल्या प्रतिक्रिया बऱ्याच बोलक्या आहेत.

शिवाय गेल्या वर्षी सोबत असलेले माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर यांनीही अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये येण्याची तयारी दर्शवली आहे. एकाचवेळी दोन पक्षांतर्गत विरोधकांशी सामना करताना चिखलीकरांची दमछाक होणार आहे. चिखलीकर लोकसभेचा उमेदवार मीच, असे सांगत प्रचाराला लागले आहेत, पण धक्कातंत्रासाठी ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या पक्षाकडून चिखलीकरांनाच धक्का दिला जातो का? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिखलीकरांनी तयारी सुरू केली आहे. भिंती रंगविणे, स्टिकर लावणे, बैठका, मेळावे याचा धडाका सुरू आहे. या त्यांच्या तयारीवर अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाने पाणी तर फिरणार नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. खरं तर चिखलीकर यांची राजकारणातील वाटचाल ही काँग्रेसमधूनच झाली आहे. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी अनेक पदं उपभोगली आहेत‌.

लोकभारती, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आता भाजप असाही त्यांचा चौफेर राजकीय प्रवास झाला आहे. अशोक चव्हाण यांचे कट्टर विरोधक म्हणून सध्या ते ओळखले जातात. मिशन-45 गाठण्यासाठी भाजपचे केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्व कुठल्याही तडजोडीला तयार आहे. अशोक चव्हाण यांचा भाजपमधील प्रवेश आणि महत्त्व लक्षात घेता त्यांना विचारल्याशिवाय नांदेड लोकसभेचा उमेदवार निश्चित केला जाणार नाही.

साहजिकच त्यांचा चिखलीकरांच्या नावाला विरोध राहील, अशावेळी मेहुणे माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर किंवा त्यांच्या सूनबाई डॉ. मिनल पाटील खतगावकर यांचे नाव पुढे केले गेले, तर नवल वाटायला नको? त्यामुळे खासदार प्रताप पाटील चिखलीकर पुन्हा डेंजर झोनमध्ये गेले आहेत.

Share This Article
error: Content is protected !!