राज्यसभेच्या ५६ जागांपैकी ४१ जागांवरची निवडणूक बिनविरोध..
नवी दिल्ली – राज्यसभेच्या पंधरा जागांसाठी आज (दि. २७) फेब्रुवारीला तीन राज्यांत मतदान होणार आहे. दर दोन वर्षाला राज्यसभेच्या किमान ३३ टक्के जागांवर निवडणूक होते. उत्तर प्रदेशात दहा जागा, हिमाचल प्रदेशासाठी एक जागा आणि कर्नाटकाच्या चार जागांसाठी मतदान होणार आहे.
राज्यसभेच्या ५६ जागांपैकी ४१ जागांवरची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आता पंधरा जागांवर निवडणूक होत आहे.
उत्तर प्रदेशातील दहा राज्यसभा जागांसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. एकूण ११ उमेदवार मैदानात आहेत. त्यात ८ भाजपचे आणि तीन समाजवादी पक्षाचे आहेत. उत्तर प्रदेशात ४०३ सदस्यीय विधानसभेसाठी ३९७ आमदार मतदानासाठी पात्र आहेत. उत्तर प्रदेशातील निवडणुकीचे समीकरण आता राजा भय्या, सुभासपा, निषाद पक्ष, रालोदवर अवलंबून आहे.
भाजपला सात आणि समाजवादी पक्षाचे दोन उमेदवारांचा विजय निश्चित आहे. एका जागेवर अडचण आहे. राजा भय्या आणि जयंत चौधरी यांनी भाजपला मतदान करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अखिलेश यादव यांचा तिसरा उमेदवार निवडून येणे कठीण आहे. हिमाचलमध्ये कॉंग्रेसने अभिषेक मनु सिंघवीला उमेदवार दिली आहे. या ठिकाणी जिंकण्यासाठी कोणत्याही पक्षाला ३५ मते मिळणे गरजेचे आहे.
कॉंग्रेसकडे ४० आमदार आहेत आणि तीन अपक्ष आमदार देखील सरकारसमवेत आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचे पारडे जड आहे. भाजपने तेथे हर्ष महाजन यांना तिकीट दिले आहे. कर्नाटकातील चार जागांसाठी पाच उमेदवार मैदानात आहेत. दरम्यान, बारा राज्यांत बिनविरोध झालेल्या ४१ नेत्यांत कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, अशोक चव्हाण, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, एल-मुरुगन यांचा समावेश आहे.
राज्यसभेच्या आताच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक वीस जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर कॉंग्रेस सहा, तृणमूल कॉंग्रेस चार, वायएसआर कॉंग्रेस तीन, राजद, बिजेडीला प्रत्येकी दोन आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, बीआरएस, जेडीयूला प्रत्येकी एक-एक जागा मिळाली आहे.