नांदेड – लोकसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने सर्वांनीच जोरदार तयारी सुरू केली आहे. येत्या काळात लवकरच लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते हे गृहीत धरून सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.
महायुतीच्या जागावाटपात नांदेड लोकसभेची जागा भाजपला सुटणार असल्याने पक्ष निरीक्षकांनी नांदेडला येऊन उत्सुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर, आमदार राम पाटील-रातोळीकर, नांदेड दक्षिणचे अध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे इच्छुक आहेत, तर काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या डॉ. मीनल पाटील खतगावकर यांनीदेखील उमेदवारी मागितली आहे. या जागेसाठी चार उमेदवार उत्सुक असल्याने पक्ष कोणाला उमेदवारी देतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
भाजपने मिशन 45 यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. नांदेडची जागा डेंजर झोनमध्ये असल्याचे लक्षात आल्यावर पक्षाने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासारख्या तगड्या नेत्याला गळाला लावत प्रवेश दिला.
गेल्या निवडणुकीत भाजपने ही जागा काँग्रेसकडून खेचून आणली होती. या विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपने गेल्या सहा महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे.
नांदेडचा उमेदवार कोण असावा, यासाठी पक्षाने माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार जयकुमार रावल यांना निरीक्षक म्हणून पाठविले होते. या निरीक्षकांनी नांदेड शहरातील एका हाॅटेलमध्ये उत्सुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यासोबतच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या मुलाखतीतून चार नावे पुढे आली आहेत.
नांदेडच्या जागेसाठी प्रताप चिखलीकर उत्सुक आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे तसेच उमेदवारी मलाच मिळणार व जिंकून येणार, असा दावा काही महिन्यांपूर्वी केला होता. या जागेसाठी रातोळीकर, हंबर्डे हेसुद्धा उत्सुक आहेत. यांनी उमेदवारी मिळण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.