श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानमध्ये नव्याने दाखल झालेल्या पाच पैकी एका रुग्णवाहिकेचे आज नांदेड – नागपूर महामार्गावरील भोकर फाटा येथे लोकार्पण करण्यात आले. आता येथे ही रुग्णवाहिका २४ तास अपघातग्रस्तांच्या सेवेत असणार आहे.
याबाबतची माहिती अशी की, नाणीज क्षेत्री गुरुपौर्णिमेच्या दिवशी नवीन पाच रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यातील एक रुग्णवाहिका भोकर फाटा येथे देण्यात आली आहे. यापूर्वी या महामार्गावर नरसी (नायगाव) या ठिकाणी संस्थानची रुग्णवाहिका कार्यरत आहेत. या महामार्गावरील या टापूत होणारे वाढते अपघात लक्षात घेऊन येथे ही रुग्णवाहिका देण्यात आली आहे.
या लोकार्पण सोहळ्याला पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराय धरणे, नांदेडचे माजी महापौर विजय देवकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक , गौहर हसन, पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस निरीक्षक जगन पवार, महामार्गाचे पोलीस सुरक्षा पथकातील लकूले, अंबुलन्सचे सेक्रेटरी राजन बोडेकर, निरीक्षक काकासाहेब वनार्से , राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रेखा पाटील,मा. विजय भाऊ येवणकर, लक्ष्मीकांत गोणे प्रसिद्धी प्रमुख भारत रॅपनवाड डॉ. शुभांगी देवसकर, डॉ. सचिन आंबेकर, संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष हंसाजी कदम, महिला अध्यक्ष संगीता अडकीने, सचिव संभाजी पाटील निरक्षक विश्वानाथ इंगळे, गोविंद उपासे, दक्षता अधिकारी भानुदास जाधव बिन प्रमुख आनंद आढावअशी विविध क्षेत्रात कार्यरत असलेली मंडळी उपस्थित होती. सूत्रसंचालन संभाजी पाटील यांनी केले.
पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराय धरणे यांच्यासह सर्वच मान्यवरांनी संस्थानच्या या मोफत रुग्णवाहिका उपक्रमाचे व अन्य सेवाभावी कार्याचे कौतुक केले. संस्थांकडे आता एकूण ४२ रुग्णवाहिका आहेत. गेल्या १३ वर्षांपासून अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवणारी ही सेवा सुरू आहे. ती पूर्ण मोफत आहे. या सेवेमुळे आत्तापर्यंत १९ हजारांवर जखमींना जीवदान मिळाले आहे.
नांदेड – नागपूर महामार्गावरील भोकर फाटा येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण करताना पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराय धरणे,राजन बोडेकर,सहाय्यक पोलीस अधीक्षक गौहर हसन, निरीक्षक हनुमंत गायकवाड आदी.