मध्यप्रदेशातील झाबुआ येथे नांदेडच्या डॉ.अश्विन लव्हेकर यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – रोटरी इंटरनॅशनल ही जगातील जुनी आणि प्रतिष्ठीत संस्था आहे. आपल्या विविध उपक्रमासोबत वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा रोटरी कार्यरत आहे.

1998 मध्ये रोटरी इंटरनॅशनलचे पहिले भारतीय अध्यक्ष श्री राजा साबू यांच्या पुढाकाराने विविध रोटेरियन डॉक्टर्स भारतातील दुर्गम भागात रूग्णसेवेसाठी आणि तेथील डॉक्टरांच्या प्रशिक्षणासाठी जाऊ लागले.आतापर्यंत नागालँड, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर येथील दूरवरच्या भागात अनेक दिवसांचा हा वैद्यकीय शस्त्रक्रिया उपक्रम पार पडला आहे आणि त्यामुळे रोटरीची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

याचाच एक भाग म्हणून मध्यप्रदेशातील झाबुआ या भिल्ल आदिवासी भागात रोटरी डिस्ट्रिक्ट 3040, 3080 व मध्यप्रदेश शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मागील महिन्यात आठ दिवसांचे वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रिया शिबीर संपन्न झाले. यामध्ये नांदेड येथील रोटरी सदस्य व कान,नाक,घसा तज्ज्ञ डॉ.अश्विन लव्हेकर यांनी आपली सेवा दिली.यापूर्वीही डॉ.लव्हेकर यांनी छत्तीसगडमधील दोन अशा उपक्रमांना उपस्थिती नोंदविली आहे.झाबुआ हा भाग मध्यप्रदेश व गुजरातच्या सिमेवर येतो आणि अतिदुर्गम समजला जातो.तसेच हा भाग गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध आहे.

त्यामुळे रोटरीचे हे शिबीर विशेष समजले जाते.यावेळी डॉ.अश्विन लव्हेकर यांनी शेकडो कान,नाक,घसा रूग्णांवर औषधोपचार केले, अनेक रूग्णांच्या कानाच्या शस्त्रक्रिया, नाकाच्या हाडाच्या शस्त्रक्रिया, दुर्बिनीद्वारे कानाचे उपचार (एन्डोस्कोपीक इअर सर्जरी), गळ्याच्या गाठींच्या अवघड शस्त्रक्रिया (पॅरोटीड ट्यूमर, नेक मास) इत्यादी यशस्वीरित्या केल्या.
दिल्ली येथील वरिष्ठ रोटेरियन श्री सुभाष गर्ग,चंदीगड येथील प्लास्टीक सर्जन डॉ.सुरिंदर,डॉ. मेहता,रांची येथील डॉ. भारत तसेच भारतातील विविध तज्ज्ञ सर्जन यांनी आपले योगदान यावेळी दिले.टीममधील स्वयंसेवी रोटेरियन सदस्य व सर्व सहभागी डॉक्टर्स यांनी आपली सेवा विनामुल्य दिली व अडचणींचा सामना करून हा उपक्रम यशस्वी केला.

वरील प्रतिष्ठीत उपक्रमात योगदान दिल्याबद्दल रोटरी डिस्ट्रिक्ट 3040, 3080, 3132, रोटरी क्लब नांदेड, रोटरी क्लब इंदौर,रोटरी क्लब झाबुआ, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती हेरकळ, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर किशोर पावडे, नांदेड रोटरी अध्यक्ष प्रशांत देशमुख,सचिव डॉ. देवेंद्र पालीवाल यांनी रो.डॉ.अश्विन लव्हेकर यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Share This Article
error: Content is protected !!