नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – विविध व्यवहारातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी जागरूक राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या छत्रपती संभाजी नगरचे विभागीय संघटक बालाजी लांडगे यांनी केले.ते बसस्थानकात विश्वासू प्रवासी संघटना व ग्राहक पंचायत महाराष्ट्र नांदेडच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्राहक मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वासू प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर होते.
ते पुढे म्हणाले की,ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून भारतात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी २4 डिसेंबर 1986 रोजी लोकसभेत ग्राहक संरक्षण कायदा संमत करून घेतला. ग्राहकांची वजन,वस्तू खरेदीत नेहमीच फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जातो.ही फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकाने नेहमीच जागरूक राहून कोणत्याही वस्तूची खरेदी करताना पावती घेतली तर न्याय मिळवण्यासाठी ग्राहक आयोगात दाद मागता येते. यासाठी आवश्यक मार्गदर्शन, ग्राहक पंचायत महाराष्ट्र तर्फे आपणास करण्यात येते, हे सांगताना त्यांनी ग्राहक पंचायतकडे मार्गदर्शनासाठी आलेल्या ग्राहकांना न्याय मिळवण्यासाठी कशा पद्धतीने मदत केली याची माहिती उपस्थितांना दिली.
अध्यक्षीय समारोपात ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे कार्य अनमोल आहे परंतु यासाठी ग्राहकाने अन्याय झाल्यास व्यवहारात पावतीचे किती महत्त्व आहे हे उपस्थितांना विश्वासू प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर यांनी पटवून दिले.
या मेळाव्यास जिल्हा संघटक प्रा. आनंद कृष्णापूरकर, प्रा. संजय केंद्रे ग्राहक मंचाचे कोषाध्यक्ष तथा विश्वासू प्रवासी संघटनेचे सहसचिव श्री रमाकांत घोणसीकर यांनी समायोचित मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या उपस्थितांना ग्राहक मार्गदर्शिकेचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला रामेश्वर गोडसे,आनंद सोनटक्के,रमाकांत यांच्यासह असंख्य प्रवाश्यांची उपस्थिती होती.