प्रताप पाटील चिखलीकरा यांच्या विरोधात नांदेडमध्ये काँग्रेसकडून वसंतराव चव्हाणच

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

नांदेड – गेल्या 40 वर्षांपासून नांदेड जिल्ह्यावर एक हाती वर्चस्व राखलेल्या अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर लोकसभेसाठी काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या.

काँग्रेसने नांदेडमधून चव्हाण यांनाच उमेदवारी दिली आहे. वसंत चव्हाण यांच्या उमेदवारीवर अपेक्षेप्रमाणे आज शिक्कामोर्तब झाले. अशोक चव्हाण यांच्यासोबतच अनेक वर्षे राजकीय डावपेच शिकलेले वसंत चव्हाण आता त्यांना आव्हान देणार आहेत.

राज्यातील महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असताना काँग्रेसने मराठवाड्यातील लातूर व नांदेडचे उमेदवार घोषित केले आहेत. नांदेडचा काँग्रेसचा अवघड किल्ला लढविण्याची जबाबदारी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्यावर टाकण्यात आली आहे. त्यांच्या नावाची एकमेव शिफारस करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित मानले जात होते.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात नांदेडची जागा काँग्रेसला सुटणार हे निश्चित होते. गेल्या काही दिवसांपासून उमेदवारांची चाचपणी सुरू होती. नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण  यांच्या नावाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. ते तीन वेळा आमदार राहिले आहेत. तसेच नायगाव, देगलूर-बिलोली या भागात त्यांचा चांगला जनसंपर्क व दबदबा आहे.

भारतीय जनता पक्षात अशोक चव्हाण गेल्यावर वसंत चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये राहणे पसंत केले. भारतीय जनता पक्षात अशोक चव्हाण गेल्याने काँग्रेसची परिस्थिती अवघड झाली आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीत वसंतराव चव्हाण यांना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याशी दोन हात करून नांदेडची जागा खेचून आणावी लागणार आहे.

Share This Article
error: Content is protected !!