हिमायतनगर/माधव काईतवाड
हिमायतनगर. : हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत करण्यात येत असलेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असून ठेकेदाराकडून ही कामे थातूरमातूर पद्धतीने केली जात असतानाही ग्रामपंचायत ठेकेदारावर मेहेर नजर का दाखवत आहे? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशीची मागणीही पुढे येत आहे.
सिरंजनी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्त्याची कामे करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत गल्लीबोळातील रस्त्यावर पेव्हर ब्लॉक म्हणजेच अंथरले जात आहेत. हे पेव्हर ब्लॉक अंथरताना रसत्याच्या रूंदीकडे दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्याचे लेव्हलिंग न करताच हे पेव्हर ब्लॉक अंथरले जात असल्यामुळे आणि कडांना योग्य पद्धतीने सिमेंट वापरले गेले नसल्यामुळे या रस्त्याचे काम केवळ ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी केले जात आहे की काय? असा सवाल केला जात आहे.हे काम केले जात असताना रस्ता रूंद असूनही काही ठिकाणी पेव्हर ब्लॉकच्या दोन किंवा तीनच रांगा अंथरल्या जात आहेत तर काही ठिकाणी रस्ता तसाच सोडून दिला जात आहे. त्यामुळे आधीच अरूंद असलेले रस्ते आणखीच अरुंद होत आहेत आणि नागरिकांना या रस्त्याने चालणेही मुश्कील होत आहे.
पेव्हरब्लॉकअंथरण्याबरोबरच काही ठिकाणी सिमेंट नालीचे कामही केले जात आहे. परंतु सिमेंट नाली बांधकाम केल्यानंतर त्या कामावर पाणीच टाकले जात नसल्यामुळे या सिमेंटचा भुगा होत आहे. या सिमेंट बांधकामातही निर्धारित प्रमाणापेक्षा कितीतरी कमी सिमेंट आणि गिट्टी वापरली जात आहे. त्यामुळे पहिल्या पावसातच या नाल्या जमीनदोस्त होण्याचा धोका आहे ज्या ठेकेदाराला सिरंजनीतील दलित वस्ती सुधार योजनेचे हे काम दिले आहे, त्याच्याकडून ही सर्वच कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची केली जात आहेत. तरीही ग्रामरंचायतीकडून ठेकेदाराकडे कानाडोळा केला जात आहे.
या सर्वच कामाची गुणनियंत्रण पथकामार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि ठेकेदाराची देयके तात्काळ थांबवून त्याच्याकडून दंडासह नुकसान भरपाई करावी तसेच या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.