धरण विरोधी संघर्ष समितीची मांडवी व पारवा पोलीसांत तक्रार
धरणाचे काम सुरू केल्यास ते काम बंद पाडू
आचार संहितेचा आधार घेऊन धरण विरोधी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न
माहूर तालुका प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी
माहूर – निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ-मराठवाड्याच्या शिष्टमंडळाने किनवट तालुक्यातील मांडवी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गफुर शेख व आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा पोलिस चौकीचे ठाणेदार संदिप बारिंगे यांच्याकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याविरुद्ध आज बुधवार २७ मार्च रोजी पोलीसात लेखी तक्रार करून त्यांच्यावर पोलीसांनी गुन्हे दाखल करण्याची मागणी केल्याने पाटबंधारे विभागात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,
निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील मुख्य भिंतीत येणाऱ्या खडका व खंबाळा या दोन्ही पेसा अंतर्गत ग्रामसभेने काही मागण्या व अटी टाकून धरणाला समर्थन असल्याचा ठराव दिला होता परंतु, ग्रामसभेच्या ठरावातील मागण्या जर शासन मान्यच करणार नसेल तर हा प्रकल्प आमच्या ग्रामसभेला मान्य नसेल व हाच ठराव धरण विरोधातील समजण्यात यावा!असे स्पष्टपणे लिहिले असतानाही त्या ठरावातील कोणत्याही मागण्यांची पूर्तता अद्यापपर्यंत झाली नाही किंवा त्यावर साधी चर्चाही न करता पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी पेसा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या ठरावाची पायमल्ली करून तेथील ग्रामपंचायतच्या क्षेत्रात धरणाच्या मुख्य भिंतीच्या कामाला सुरुवात केली आहे.तसेच जल आयोगाची जी परवानगी होती ती व्यापगत झाली.तर पर्यावरण विभागाची परवानगी 2017 पर्यत होती तीसुद्धा व्यापगत झाली.या दोन्ही विभागाच्या परवानग्या पाटबंधारे विभागाने नव्याने मिळविल्याशिवाय त्यांना प्रकल्पाचे बांधकाम करता येत नाही!असे नियम आहेत. त्याचप्रमाणे या भागात जिऑलाॅजिकल सर्वे करण्यात आलेला नाही.निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात अनेक गावात गरम पाण्याचे गंधकाचे झरे असून हा भाग धोकादायक असा भूकंपप्रवण क्षेत्रात येतो.
आदर्श आचार संहिताच्या आडून धरण विरोधी संघर्ष समितीचे आंदोलन दडपण्याचा शासनाचा व पाटबंधारे विभागाचा हा प्रयत्न असून,पेसा ग्रामसभेला डावलून ग्रामसभेचे अधिकार पायदळी तुडवून पाटबंधारे विभागाचे अधिकारी हिटलरशाही व हुकुमशाही पद्धतीने या प्रकल्पाचे काम सुरू करत आहेत.
तसेच या प्रकल्पाच्या संबंधाने ठेकेदाराला दिलेला प्रकल्पाचा कार्यरंभ आदेश हा सुद्धा चुकीचा असल्याची तक्रार धरण विरोधी संघर्ष समितीने केली असून ग्रिन टयुबनल कोर्ट,पुणे व हायकोर्ट, औरंगाबाद येथे ह्या प्रकल्पा विरोधात केसेस न्यायालयात प्रलंबित आहेत. कायद्याची बाजू राखण्यासाठी कायद्यानुसार काम व्हावे ही धरण विरोधी संघर्ष समितीची मागणी असून यासाठी जर या प्रकल्पाचे काम पुन्हा दुसऱ्यांदा सुरू झाले तर आम्ही ते काम बंद पाडू; मग त्यासाठी धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली तरी त्याची आम्ही पर्वा करणार नाही !असे धरण विरोधी संघर्ष समितीचे प्रसिद्ध प्रमुख तथा संघटक सचिव आणि यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर,समितीचे कोषाध्यक्ष प्रल्हादराव गावंडे सर, सचिव विजय पाटील राऊत यांनी आज बुधवार २७ मार्च रोजी मांडवी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गफुर शेख व सावळी सदोबा पोलिस चौकीचे ठाणेदार संदीप बारींगे यांना भेटून दिलेल्या निवेदनात धरण विरोधी संघर्ष समितीची टोकाची भूमिका मांडली आहे.
न्यायालयाचा व पेसा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या ठरावाचा अनादर करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर पोलीसांनी तातडीने गुन्हे दाखल करावेत! अशी मागणी निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याच्या शिष्टमंडळाने लेखी निवेदनातून केली आहे.धविसं समितीच्या या धडक भुमिकेमुळे संबंधित प्रशासनात मोठी खळबळ माजण्याची शक्यता असून,मांडवी व सावळी सदोबा येथील पोलीस यावर आता नेमकी काय कार्यवाही करतात? याकडे बुडीत क्षेत्रातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.