नवी दिल्ली – भारतातील सर्वांत श्रीमंत महिला आणि हरियाणाच्या माजी मंत्री यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला रामराम ठोकला आहे. काँग्रेसला राजीनामा देऊन त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
भारतीय व्यवसाय आणि राजकारणात त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. आता भाजपात प्रवेश केल्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या. त्यामुळे त्यांचं वय, शिक्षण, करिअर, कौटुंबिक माहिती आणि संपत्ती याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
२०२३ मध्ये सावित्री जिंदाल यांनी देशातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांना मागे टाकलं होतं. त्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. आर्थिक सुबत्तेबाबत त्या प्रसिद्ध असल्या तरीही त्यांचं समाजासाठी सुरू असलेलं काम आणि नेतृत्त्व कौशल्य पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारं आहे.
सावित्री जिंदाल यांची कौटुंबिक पार्श्वभूमी
२० मार्च १९५० रोजी आसाममधील तिनसुकिया येथे जन्मलेल्या सावित्री जिंदाल या मध्यमवर्गीय हिंदू मारवाडी कुटुंबातील आहेत. १९७० मध्ये त्यांनी जिंदाल ग्रुपचे संस्थापक ओम प्रकाश जिंदाल यांच्याशी विवाह केला. जिंदाल ग्रुप स्टील आणि पॉवर क्षेत्रात प्रसिद्ध आहे. परंतु, २००५ मध्ये एका हेलिकॉप्टर अपघतात ओम प्रकाश बिर्ला यांचं निधन झालं. त्यामुळे पतीच्या निधनानंतर सावित्री जिंदाल यांनी जिंदाल समूहाच्या अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारली आणि पुढच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू केली.