लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षाने विरोधकांना सन्मान द्यायचा असतो – शरद पवार

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

बहुमत नसताना सत्तेचा स्वीकार करणे मला योग्य वाटले नाही

पुणे – ‘एच. डी. देवेगौडा हे पंतप्रधान होण्यापूर्वी कॉंग्रेस पक्षाची बैठक झाली होती. तेव्हा कॉंग्रेस व त्यांच्यासमवेतचे सर्व घटक पक्ष त्या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताची स्थिती नव्हती.

बहुमत नसताना सत्तेचा स्वीकार करणे मला योग्य वाटले नाही. त्यामुळे तेव्हा, पंतप्रधानपदाबाबत निर्णय घेण्याचा प्रश्‍नच नव्हता’ अशा शब्दात, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

भाजपचे खेड तालुका समन्वयक अतुल देशमुख यांनी गुरुवारी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. यावेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, विकास मुंगसे आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारत चीन संबंध निवडणुकीमध्ये आणल्याच्या प्रश्‍नाबाबत पवार म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे. 1974 मध्ये इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना एक छोटे बेट श्रीलंकेला दिले, त्यावरुन आता चर्चा रंगवली जाते. पण त्यांनी अशा चर्चाऐवजी चीन भारताच्या भूमीवर अतिक्रमण करत असताना त्यांनी नेमक्‍या काय उपाययोजना केल्या, याची उत्तरे द्यावीत.

लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षाने विरोधकांना सन्मान द्यायचा असतो. पं. जवाहरलाल नेहरू यांच्यासह सर्व पंतप्रधानांनी संसदेत विरोधकांचा सन्मान केला. असे असताना, देशात एकही विरोधी पक्षाचा नेता निवडून येऊ द्यायचा नाही, असे मोदी आपल्या भाषणात सांगतात. संजय राऊत, पुतीन व नरेंद्र मोदी यांच्यात काहीही अंतर नाही, असे सांगतात, ते योग्य बोलतात असे वाटू लागले आहे.”

कोल्हापूरचे कॉंग्रेस उमेदवार शाहू महाराज यांच्यावर संजय मंडलीक यांनी टीकेबाबत पवार म्हणाले, ‘राजघराण्यामध्ये दत्तक घेणे हे काही नवीन नाही. शाहू महाराजांचे सामाजिक, शैक्षणिक काम मोठे आहे. अनेक शैक्षणिक संस्थांचे नेतृत्व शाहू महाराज हेच करत आहेत. लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी कृतज्ञता आहे. पण हा सगळा प्रचार व राजकारण किती खालच्या पातळीला चालू आहे, याची मानसिकता दिसून येते.’

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!