नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – काल धर्माबाद शहरासह तालुक्यातील परिसरांना मेघगर्जना व विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने झोडपले असून अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडली असून त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे धर्माबाद करांना रात्र वैऱ्याची होती.
काल सायंकाळी सहा ते साडेसातच्या दरम्यान दोन वेळेस पावसाने झोडपले. सोसायट्याचा वारा, मेघगर्जना, विजेचा प्रचंड कडकडाट यामुळे धर्माबाद शहरात भयावह वातावरण निर्माण झाले होते.
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे टाळकी ज्वारीचे काढून ठेवलेले पीक पावसामुळे भिजले असल्याचे वृत्त असून जीवित हानी जरी झाली नसली तरी बऱ्याच ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले होते. तर वीज वितरण कंपनीच्या तारेवर अनेक झाडांच्या फांद्या तुटून पडल्यामुळे विद्युत तारा तुटून गेल्या व विद्युत पुरवठा खंडित झाला.
रात्री उशिरापर्यंत वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला असला तरी विद्युत दाब स्थिर नसल्यामुळे अनेकांची विद्युत उपकरणे जळाल्याची धक्कादायक माहिती पुढे येत असून आगीतून सुटून फुपाट्यात पडल्याचे दृश्य होते.
वारा आला म्हणजे वीज गेली असेच समीकरण आता रूढ होत असून विद्युत तारेला स्पर्श करणारे झाडे,फांद्या तोडण्यासाठी व विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज वितरण कंपनीकडे विशेष अर्थसहाय्य दिल्या जाते पण त्या गोष्टीचा योग्य वेळी उपयोग होत नाही.त्यामुळे थोडा जरी वारा आला की वीज गेलीच म्हणून समजा! त्यामुळे सद्यस्थितीत विद्युत तारांना स्पर्श करणाऱ्या सर्व ट्री कटिंग करून घेणे गरजेचे आहे.
धर्माबाद नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडे पुरेशी कर्मचारी संख्या नसल्यामुळे अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरत आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला असून लाईट गेल्यावर तर धर्माबाद वासिय मरण यातना भोगत आहेत.