पुणे – देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीचा ज्वर चढला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोमवार (ता. २९) आणि मंगळवार (ता. ३० रोजी) विविध ठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
यादरम्यान मोदी यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राम सातपुतेंच्या प्रचारासाठी सभेला संबोधित केले. यावेळी मोदींनी काँग्रेसह इंडिया आघाडी आणि राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर निशाना साधला आहे. मोदींनी काँग्रेसह इंडिया आघाडीवर तोफ डागताना यांच्याकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नसून तुम्ही यांच्या हातात देश देणार का असा सवाल उपस्थित जनसमुदायाला केला आहे. तर काँग्रेसने ६० वर्षांच्या काळात एससी/एसटी/ओबीसींची सर्वात वाईट अवस्था केल्याचा आरोप केला आहे.
मोदी म्हणाले, “इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये नेतृत्वावरूनच सध्या महायुद्ध सुरू आहे. एवढा मोठा देश नेतृत्व नसणाऱ्या लोकांच्या हातात देऊन कसे चालेल. या आघाडीला नेतृत्व नाही. नेतृत्वाला चेहरा नाही. मात्र यांच्या आघाडीत पंतप्रधान पदासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत. याच्यांतील एका पक्षाचा नेता पंतप्रधान पदाची खांडोळी करायला निघाला आहे. तो पाच वर्षात ४ पंतप्रधान झाले तर काय हरकत आहे? असे बोलत आहे. हे विधान नकली शिवसेना असणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेत्याकडून केले जात आहे असे मोदी म्हणाले.
संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही
तसेच आता फक्त दोनच मतदानाचे टप्पे पार पडले असून काँग्रेस आणि इंडिया आघाडी घाबरली आहे. यातूनच ते सतत खोटे बोलत आहेत. खोट्या गोष्टी पसरवत आहेत. भाजपवाले संविधान बदलतील वर्णभेद लादतील अशा बतावण्या केल्या जात आहेत. मात्र मी आधीच सांगितले आहे, की बाबासाहेबांची इच्छा असली तरी, आम्ही संविधान बदलणार नाही. आम्ही संविधान बदलू शकत नाही, आरक्षण संपवू शकत नाही.
दोन टप्प्यातील मतदानातच हारले
पुढे मोदी म्हणाले, मी धन, दौलत यश, आणि किर्ती मागण्यासाठी आलो नाही फक्त तुमचा आशिर्वाद मागण्यासाठी आलो आहे. या निवडणुकीत आम्ही पुढील ५ वर्षांच्या विकासाची हमी देत असून तुम्ही तेच निवडाल. पण ज्यांनी २०१४ पूर्वी देशाला दहशतवाद, भ्रष्टाचार आणि कुशासनाच्या दरीत ढकलले त्यांना नाकाराल अशी खात्री आहे. यामुळे काँग्रेसवाले आणि इंडिया आघाडीचे नेते या दोन टप्प्यातील मतदानातच हारले आहेत.