रत्नागिरी – भाजपा उमेदवाराला मत म्हणजे मोदींना मत असा प्रचार करू लागले आहेत पण मी सांगतो, मोदींना मत म्हणजे विनाशाला मत आहे. त्यामुळे जनतेने जागरूक रहावे, अशी साद घालत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज थापाडय़ा भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
कोकणात शिवसेनेचे तुफान आले असून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी रत्नागिरी येथे खणखणीत सभा झाली. या सभेला अलोट गर्दी उसळली होती.
कोकणात आम्हाला प्रचार करायची गरजच नाही. कोकण हे शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाचे हृदय आहे, असे भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे म्हणाले. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपा, मोदी-शहा, मिंधे गट, नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रद्वेषी आहेत. कारण स्वराज्यद्वेषी औरंगजेब त्यांच्या गुजरातमध्ये जन्मला. त्याला आम्ही काय करणार. आमच्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मले. ते आमचे वैभव असून देशाची शान आहेत. म्हणूनच केंद्रातील लोक महाराष्ट्राचा द्वेष करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत म्हणूनच महाराष्ट्रद्वेषापोटी मोदी-शहा संविधान बदलू पाहताहेत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी आज केला.