चव्हाण-बेटमोगरेकर यांच्यात नवे नातेसंबंध साक्षगंध सोहळा थाटामाटात

abhishek bakkewad
4 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – सार्वजनिक तसेच राजकीय संबंधांतून
जिल्ह्यामध्ये नातेसंबंधांची मोठी वीण तयार करणाऱ्या नायगाव बाजारच्या चव्हाण कुटुंबाचे मुखेडच्या बेटमोगरेकर परिवारात आणखी एक नाते निर्माण झाले आहे.यानिमित्ताने गुरुवारी सायंकाळी येथे अत्यंत थाटात पार पडलेल्या साक्षगंध समारंभासाठी काँग्रेससह या पक्षाच्या प्रतिस्पर्धी पक्षांतील नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यांच्यातील सौहार्दाचा सहज वावर बघायला मिळाला.

नांदेड लोकसभा मतदारसंघातील मतदान २६ एप्रिल रोजी झाल्यानंतर आठवडाभरात काँग्रेस उमेदवार वसंतराव चव्हाण यांची पुतणी दिव्या व मुखेडचे माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचे अभियंता पुत्र अभिजीत यांचा साक्षगंध सोहळा दोन्ही परिवारांतले आप्त आणि समान हितचिंतकांच्या उपस्थितीत थाटात पार पडत असताना काँग्रेस पक्षातील वसंतरावांचे सहकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होतेच पण वसंतरावांनी ज्यांची झोप उडवली आहे, त्या भाजपातील अनेक नेते व कार्यकर्तेही वरील कौटुंबिक सोहळ्यात सहभागी झाले. वसंतराव चव्हाण हे बेटमोगऱ्याचे नेते, दिवंगत माधवराव पाटील बेटमोगरेकर यांचे जावई,नंतरच्या काळात वसंतरावांचे चिरंजीव प्रा.रवींद्र चव्हाण यांची सोयरिक माधवरावांच्याच नातीशी झाली. चव्हाण परिवारातील इतर मुला-मुलींचे विवाह वेगवेगळ्या राजकीय कुटुंबात झालेले आहेत.त्यात आता आणखी एका नातेसंबंधाची भर पडली असून निवडणुकीमध्ये वसंतरावांना याच नातेसंबंधांचा मोठा आधार मिळाला.

दिव्या ही वसंतरावांचे चुलत बंधू, नायगावचे माजी नगराध्यक्ष विजय चव्हाण यांची कन्या. विजय हे खा.अशोकराव चव्हाण यांच्या चमूत दुसऱ्या फळीत काम करणाऱ्या सहकाऱ्यांचे खास मित्र. खा.अशोकराव चव्हाण नांदेडबाहेर असल्यामुळे ते सोहळ्यात सहभागी झाले नाहीत,पण त्यांचे भाजपातले अनेक सहकारी नियोजित दाम्पत्यास शुभेच्छा देण्याकरिता राजकीय विरोध बाजूला ठेवून हजर असल्याचे दिसले. त्यात दिनेश बाहेती, विजय येवनकर, श्रीकांत गुंजकर, बाबूराव गिरे इत्यादींचा समावेश होता.

भाजपाच्या नेत्यांपैकी भास्करराव खतगावकर
यांचे वसंतराव चव्हाण परिवाराशी आधीचेच नातेसंबंध आहेत. निवडणुकीत खतगावकर परिवाराने भाजपासाठी प्रचार केला, पण साक्षगंध सोहळ्यात खतगावकर हे पत्नी ताराबाई तसेच स्नुषा डॉ.मीनलताई यांच्यासह आले होते. माजी मंत्री माधव किन्हाळकर व वसंतराव हे दोघे अनेक वर्षे ‘राष्ट्रवादी’त एकत्र होते.आता भाजपात असलेले किन्हाळकर आणि याच पक्षाचे नायगावमधील वसंतरावांचे विरोधकही ‘साक्षगंध’चे साक्षीदार झाले.खा.प्रताप पाटील चिखलीकर सोहळ्यास आले नाहीत,पण त्यांच्या सौभाग्यवती हजर होत्या.लोकसभा निवडणुकीच्या काही आठवडे आधी अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षासह या पक्षाची आमदारकी सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर या पक्षातील अनेक समर्थक त्यांच्या माध्यमातून भाजपात गेल्यामुळे कागदोपत्री काँग्रेस पक्ष कमकुवत वाटत असे वाटत असताना वसंतराव चव्हाण, हणमंतराव बेटमोगरेकर, ईश्वरराव भोसीकर हे माजी आमदार,माधवराव जवळगावकर व मोहन हंबर्डे हे विद्यमान आमदार तसेच बी. आर.कदम,ड्रा.श्रवण रॅपनवाड,संजीवकुमार गायकवाड,प्रा.सोनकांबळे,श्याम दरक व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मात्र काँग्रेससोबत राहण्याची भूमिका घेतली.मग कार्यकर्ते आणि हितचिंतकांच्या बळावर हे सारे निवडणुकीला सामोरे गेले. काँग्रेसचा हा चमूही सोहळ्यास हजर होता.

मतदानानंतरच्या आठ दिवसांत जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले अंदाज काँग्रेसचा उत्साह वाढविणारे तर अशोक चव्हाणांसह संपूर्ण भाजपाच्या चिंतेत भर घालणारे दिसत आहेत.या पार्श्वभूमीवर गुरुवारच्या साक्षगंध सोहळ्यात त्याच्या अव्यक्त खाणाखुणा जाणवत होत्या. वसंतरावांचे सहकारी मोठ्या उत्साहात तर भाजपातील नेते-कार्यकर्ते चितेत, असे दृश्य बघायला मिळाले.
मराठा आरक्षण आंदोलनातून सगेसोयरे हा शब्द ठळकपणे पुढे आला. नांदेड जिल्ह्यात वसंतराव चव्हाण परिवाराचे सगेसोयरे किती व्यापक आहेत.

याचाही अंदाज वरील सोहळ्यातून उपस्थित बिगर राजकीय हितचिंतकांना आला. साक्षगंध सोहळ्याचा औपचारिक सोपस्कार पूर्ण झाला,तरी सग्यासोयऱ्यांचे स्वागत सत्कार दुसऱ्या बाजूने सुरूच होते. शेवटी वसंतराव व हणमंतराव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानल्यावर भोजन व्यवस्थेचे दालन खुले झाले.तेथे सोहळ्याच्या भव्यतेसोबतच नांदेड लोकसभा निवडणुकीच्या संभाव्य निकालाची चर्चाही प्रत्येक भोजन टेबलावर सुरू होती. त्यात अनेकांचा कौल ‘पंजा’च्या बाजूनेच दिसत होता.

Share This Article
error: Content is protected !!