धरण विरोधी संघर्ष समिती “करा किंवा मरा” च्या निर्णायक भुमिकेत
चिमटा धरण क्षेत्रात हाय टेंपरेचर वातावरण तापले
धरण विरोधी संघर्ष समिती “करा किंवा मरा” च्या भुमिकेत
नांदेड जिल्हा प्रतिनिधी /बजरंगसिंह हजारी
नांदेड – विदर्भ व मराठवाड्यातील 95 गावांतील दीड लाख लोकांना देशोधडीला लावू पाहणाऱ्या निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम पाटबंधारे विभागाने दिनांक 3 मे रोजी सूरू करताच ह्या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील नागरिकांत भितीयुक्त चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, धरण विरोधी संघर्ष समिती व बुडीत क्षेत्रातील नागरिक संतप्त झाले आहेत. प्रकल्पाच्या मुख्य भिंतीचे व नदी पात्रातील रपट्याचे काम बंद पाडण्यासाठी सोमवार दि.6 मे रोजी धरण विरोधी संघर्ष समिती व धरणग्रस्त नागरिक खंबाळा येथील धरण बांधकाम स्थळावर सकाळी नऊ वाजता धडकणार आहेत.
चलो खंबाळाची हाक संघर्ष समितीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून व्हायरल केली आहे.त्यामुळे निम्न पैनगंगा प्रकल्प आता शासन प्रशासनाला चिंतेत टाकणार असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या 27 वर्षांपूर्वी पैनगंगा नदीवर विदर्भ व मराठवाड्याच्या खंबाळा व खडका येथे पैनगंगा नदीवर हा प्रकल्प मंजूर झाला.मात्र या प्रकल्पाच्या मंजुरी पासूनच 95 गावातील जवळपास दीड लाख लोक विस्थापित होणार असल्याने तेंव्हापासून या प्रकल्पाला धरणग्रस्तांसह सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते यांनी धरण विरोधी संघर्ष समिती स्थापन करून टोकाचा विरोध सुरू केला आहे.
महाराष्ट्राच्या सत्तास्थानी बसणारे राजकीय पक्ष हा प्रकल्प पूर्णत्वास नेऊ पहात आहेत तर धरणाला विरोध करणारे सत्ताधाऱ्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी कमालीचे धडपड करीत आहेत.
दिनांक 12 जुलै 2007 साली पाटबंधारे विभागाचे अधिकारी ह्या प्रकल्पाचे काम करण्यासाठी खंबाळा येथे आले असता तेंव्हाचे कार्यकारी अभियंता यांच्यावर धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व बुडीत क्षेत्रातील नागरिकांनी धरणाला विरोध म्हणून प्रतिकार करत हल्ला चढवला होता.त्याप्रकरणी धरण विरोधी नेत्यांवर व शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ला व इतर कलमान्वये गुन्हे दाखल झाले होते.
सुरु करण्यात आलेले प्रकल्पाच्या मुख्य भिंतीचे व नदी पात्रातील रपट्याचे काम गैरकायदेशीर असल्याचा आरोप धरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येत असून,ते काम बंद पाडण्यासाठी सोमवारी खंबाळा येथे एकवटण्याचा आहेत.खडका व खंबाळा आणि इतर गावातील ग्रामसभेने ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या जोपर्यंत शासनाकडुन मान्य होत नाहीत तोपर्यंत धरणाचे काम सुरू करण्यात येऊ नये.तसेच आधी पुनर्वसन नंतर धरण या शासनाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही गावाचे पुनर्वसन झालेले नसताना धरणाच्या कामाला सुरुवात करणे हे सुध्दा गैर कायदेशीर आहे. त्यामुळे खंबाळा येथे सुरू असलेले काम शांततेच्या मार्गाने,अहिंसेच्या मार्गाने अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने बंद पाडायचे अशी हाक निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने बुडीत क्षेत्रातील नागरिकांना दिली आहे.
दिनांक 6 मे रोजी सकाळी नऊ वाजताच्या पूर्वी खंबाळा येथील धरण स्थळावर पोहचण्याबाबत धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप, प्रसिद्धी प्रमुख तथा यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर,बंडुसिंग नाईक,विजय पाटील राऊत,डॉ.बाबा डाखोरे, प्रल्हादराव गावंडे सर,
बाबुभाई फारूकी यांनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करून अवाहन केले आहे.यावेळी धरण विरोधी संघर्ष समिती ‘करा किंवा मरा’ या भुमीकेतून आंदोलनात उतरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
*खोटे आश्वासन देऊन मुख्यमंत्री व उप-मुख्यमंत्र्यांकडून फसवणूक -धविसं समितीचा आरोप
निम्न पैनगंगा प्रकल्पाचे (चिमटा धरण) किनवट तालुक्यातील खंबाळा व घाटंजी तालुक्यातील खंबाळा या दरम्यान पैनगंगा नदी पात्रात सुरू असलेले धरणाच्या मुख्य भिंतीचे तसेच खडका व खंबाळा या गावांना नदीपात्रातून जोडणाऱ्या कच्च्या रपट्याचे काम दीड महिन्यापूर्वी निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ-मराठवाड्यातील धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बंद पाडले होते.*
*दरम्यान,महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकाीघी आचारसंहिता लागली. आचारसंहितेच्या काळात विदर्भातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीच्या भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि मराठवाड्यातील हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीच्या शिवसेना (शिंदे गट) उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चिमटा ऊर्फ निम्न पैनगंगा प्रकल्पात 95 गावातील जवळपास दीड लाख लोकं विस्थापित होत असल्याने या प्रकल्पाबद्दल जनतेचे मत ऐकून घेऊन आचारसंहिता संपल्यानंतर बैठक घेऊ आणि त्यानंतर त्यातून काही तरी मार्ग काढू! असे जाहीर आश्वासन भाषणात दिले होते. परंतु,चंद्रपूर व हिंगोली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक संपताच अवघ्या काही दिवसातच दि.03मे पासून निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या मुख्य भिंतीचे व नदीतल्या रपट्याचे काम पुढे सुरू करण्यात आले आहे.
*महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिलेले आश्वासन हे हवाहवाईच होते का ? अशी चर्चा या निमित्ताने धरणग्रस्तांमधुन ऐकावयास मिळत असून,निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या (चिमटा धरण) बुडीत क्षेत्रातील 95 गावातील नागरिकांची मते आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला मिळविण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी खोटे आश्वासन देऊन बुडीत क्षेत्रातील जनतेची फसवणूक केली नाही का? असा गंभीर आरोप धरणविरोधी संघर्ष समितिसह बुडीत क्षेत्रातील तमाम जनतेमधून जबाबदार राज्य सरकारवर लावला जात आहे.*