नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड जिल्यातील लोहा -कंधार नुकतेच दुसऱ्या टप्प्याचे मतदान दि.२६ एप्रिल रोजी पार पडलेअसून.तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे दि.७ मे रोजी होणार आहे.लोहा – कंधार ८८ विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात आहे.
लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे डॉ.शिवाजीराव काळगे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तर भाजपाकडून खा.सुधाकर श्रंगारे यांना दुसऱ्यांदा पक्षाने संधी दिली आहे.त्याचबरोबर इतरही पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत.
लोहा – कंधार विधानसभा हा मतदारसंघ खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असला तरी काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा मतदार हा मतदारसंघात आहे.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली असली तरी मतदार संघातील स्थानिक पुढाऱ्यांनी मात्र माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासोबत न जाता या मतदारसंघात अनेक दिग्गज पुढारी आजही काँग्रेस पक्षात असले तरीही उमेदवाराच्या प्रचारा ऐवजी फोटोसेशन करत स्वतःच्या प्रसिद्धीवर भर देत असल्याची चर्चा सुरू ऐकावयास मिळत आहे.
पक्षाचे स्टार प्रचारकाची कंधारच्या आठवडी बाजाराच्या दिवशी घेण्यात आली,मान्यवर सभेसाठी साहेब हेलिकॉप्टरने हवेतून आले.सभेचे म्हणावे तसे मतदारसंघात प्रसार न झाल्याने या सभेसाठी आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे गर्दी जमविता आली नसल्याचे मतदारसंघात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असले तरीही उमेदवाराचा व पक्षाचा म्हणावा तसा प्रचार व प्रसार ८८ मतदारसंघात होताना दिसत नसल्याने शेवटचा मतदार मात्र संभ्रमात पडला आहे.
महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शिवसेना व सेवा जनशक्ती पक्षाचे प्रमुख प्रा. मनोहर धोंडे हे मात्र मतदारांना भेटी गाठी देत असल्याचे दिसून येत आहे.