माहूर तालुक्यात शासकिय आरोग्य यंत्रणेचेच…आरोग्य बिघडले!

abhishek bakkewad
12 Min Read
Spread the love

साथ रोगाच्या काळात आरोग्य यंत्रणा गाफील!

पावसाळात आरोग्य विभागाला बुस्टर डोज कोण देणार?

‘दो बुंद जिंदगी के’ ची खरी गरज आरोग्य विभागाला

आरोग्य सेवेचा पंचनामा

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड : जिल्यातील माहूर तालुका हा
आदिवासी आणि दुर्गम डोंगराळ पेसा समाविष्ट माहूर तालुक्यातील गरीब व गरजू रुग्णांच्या उपचारात अडचणी येऊ नयेत यासाठी सरकारने तालुका पातळीवर ग्रामीण रुग्णालय आणि प्रमुख गावाच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे व तसेच आरोग्य उपकेंद्र सुरू केली आहेत.कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेल्या सुसज्ज इमारती केवळ शोभेच्या वस्तू बनल्या असून आठ दिवसाच्या आळीपाळीने सेवा देणाऱ्या डॉक्टरांमुळे पुरता बोजवारा उडाल्याने सर्वसामान्यांना शासनाची मोफत आरोग्य सुविधा मिळणे अवघड बनले आहे.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलजन्य आजारांचे दैनंदिन स्वरूपातील संनियंत्रणाचे महत्त्वपूर्ण कार्य साथीचे रोग उद्भवण्यापूर्वी नियंत्रण करणे गरजेचे असून यात आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत घरोघरी सर्वेक्षण करून पाण्याचे,रक्ताचे नमुने घेणे,आजारी व्यक्ती ओळखून त्वरित औषध उपचार सुरू करणे गरजेचे आहे.परंतु आरोग्य यंत्रणेकडून अद्याप कोणत्याही साथ रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या नाहीत.नुकतीच (ता.१३) रोजी पंचायत समिती सभागृहात साथ रोग आढावा बैठकीची औपचारिकता पूर्ण करून आरोग्य यंत्रणा कमालीची बेफिकीर झाल्याचे चित्र माहूर तालुक्यात सध्या पाहायला मिळत असल्याने तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचे आरोग्य बिघडले असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.

मागील दहा वर्षांत वैद्यकीय उपचारांच्या खर्चात तिपटीने वाढ झाली आहे.दिवसेंदिवस उपचार व औषधांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे.या पार्श्वभूमीवर सार्वजनिक रुग्णालयात चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्या प्रसूतीपूर्व उपचार आणि प्रसूतीसाठी सरकारी रुग्णालयांना सरकार कडून प्राधान्य दिले जात आहे.रुग्णांना ही विविध सरकारी योजनांचा लाभ होत असल्याने गेल्या काही वर्षांत सार्वजनिक आरोग्य यंत्रणेपासून दुरावलेला रुग्ण सरकारी दवाखान्यात उपचार घेण्यास प्राथमिकता देत असताना माहूर तालुक्यातील कोलमडलेल्या आरोग्य विभागाच्या सेवेमुळे नागरिकांना योग्य सेवा मिळत नसल्याचे आकड्या वरून सिद्ध होत आहे.खासगी दवाखान्यातील वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या तुलनेत सरकारी रुग्णालयात मोफत प्रसूती होते.खाजगी रुग्णालयात प्रसूतीचा सामान्यत खर्च १५ ते ५० हजार रुपयांपर्यंत येतो,याउलट सरकारी रुग्णालयांत मातृवंदन योजनेचा फायदा महिलांना होतो.त्यात आर्थिक अनुदानाचा लाभ दिला जातो.प्रसूती झाल्यानंतर महिलेस मोफत जेवण पुरविले जाते.तरी ही माहूर तालुक्यातील आरोग्य केंद्रात किंवा ग्रामीण रुग्णालय अल्प प्रमाणात प्रस्तुती होत असल्याने कोण कुठे चुकतंय हे शोधणे गरजचे आहे.कारण आज ही ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घरी प्रसूती करण्यावर भर दिला जातो. यामध्ये बाळ व आईच्या जीवाला धोका असतो. त्यामुळे जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती व्हावी यासाठी सरकारी पातळीवर अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे,त्यासाठी प्रामुख्याने खरी गरज आहे ती प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर नियुक्त कर्मचारी हे हजर असायला हवे तिथेच मात्र आरोग्य विभागाची घडी विस्कटक असून गडगंज पगार घेऊन सुद्धा वैद्यकीय अधिकारी आणि समुदाय आरोग्य अधिकारी व बहुउद्देशीय कर्मचारी जाणीवपूर्वक कर्तव्याला दांड्या मारत आहेत.साथ रोग नियंत्रण काळात औषधांचा तुटवडा, कामचुकार आरोग्य कर्मचारी यांच्यामुळे माहूर तालुक्यातील शहरी व ग्रामीण आरोग्य सेवा पूर्णतः कोलमडली आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांच्या या तालुक्यात न होणाऱ्या भेटी अनेक वर्षापासून त्यांच्या कडे असलेला पदभार माहूर तालुक्याच्या ढासळत्या आरोग्य व्यवस्थेचे अवघड जागेचे दुखणे आहे.परिणामी माहूर शहरातील ग्रामीण रुग्णालय तर तालुक्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र आता नागरिकांच्या सेवेसाठी कमी तर वादातच अधिक असल्याचे दिसून येत आहे.साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर पावसाळात आरोग्य विभागाला बुस्टर डोज कोण देणार? असा प्रश्न माहूर तालुक्यातील रुग्णसेवेअभावी विव्हाळत असलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

◼️आरोग्य केंद्र व उपकेंद्र ठरत आहेत शासनाचा पांढरा हत्ती…

ग्रामीण भागातील वाडी- वस्तीवरील रुग्णांच्या प्राथमिक उपचारासाठी मोठ्या गावांच्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आली आहे,माहूर तालुक्यात ही पाच आरोग्य केंद्र व २७ उपकेंद्र आहेत,मात्र हे आरोग्य केंद्र व उपकेंद्र पांढरा हत्ती ठरत आहे.
गत वर्षीच्या प्राप्त आकडेवारी नुसार म्हणजे एप्रिल २०२२ ते नोव्हेंबर २२ पर्यंत पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात ६७,आरोग्य उपकेंद्र येथे १४९ अशा केवळ २१७ प्रस्तुत्या झाल्याची माहिती आहे,तर वर्तमान काळातील प्रसूतीचा आकडा घेण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.माहूर ग्रामीण रुग्णालयाचा आकडा घेतला असता त्या ठिकाणी २७१ प्रस्तुत्या झाल्याची माहिती मिळाली आहे.गर्भवती महिलांची संख्या ११६१ असताना ४८८ च प्रस्तुत्या ह्या माहूर तालुक्यातील आरोग्य केंद्रात व ग्रामीण रुग्णालयात झाल्याने इतर प्रस्तुती बाहेर गावी झाल्या असतील तर नागरिकांना भुर्दंड झाले आहे,घरी प्रस्तुती झाल्या असतील तर गर्भवती महिलांच्या आरोग्याचा प्रश्न ‘जैसे थे’च असल्याचे म्हणावे लागेल.

◼️ग्रामीण रुग्णालयात प्रतिनियुक्तीने डॉक्टर नेमून ‘मलमपट्टी’

माहूर ग्रामीण रुग्णालयाच्या तुघलकी कारभाराचे अनेक सुरेख किस्से रंगले असताना सुद्धा जिल्हा शल्य चिकित्सक गंधारी च्या भूमिकेत असल्याने दीड लक्ष नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या माहूर येथील एकमेव ग्रामीण रुग्णालय सध्या प्रभारीवर असून कंत्राटी कडून ओपिडी काढल्या नंतर काही तासातच रुग्णालय डॉक्टर वीणा ओसाड पडत असल्याचे चित्र आहे.माहूर च्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक संजय पेरके यांचे सह तीन वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती होती.त्या पैकी वैद्यकीय अधीक्षक संजय पेरके हे ट्रेनिंग ला गेले आहेत.तर डॉ.व्ही.एन.भोसले व डॉ.किरण वाघमारे यांची बदली झाली आहे.गंभीर बाब म्हणजे उर्वरित तिसऱ्या डॉक्टर पोटे यांची माहूरला नियुक्ती असताना किनवटला त्यांना प्रतिनियुक्ती देऊन वरिष्ठ अधिकाऱ्याने अकलेचे तारे तोडले आहे,परिणामी कंत्राटी डॉक्टरांवर माहूर च्या ग्रामीण रुग्णालयाचा भार पडला आहे.आपल्या खाजगी रुग्णालयत लक्ष देऊन ग्रामीण रुग्णालयात ही त्यांना पूर्वी पेक्षा अधिक काम करावे लागत असल्याने त्यांना अवघड झाले आहे.कारण त्यांना केवळ ओपिडी करण्याची सवय असल्याने आता कायम स्वरुपी डॉक्टरच नसल्याने त्यांच्यावर अंतर रुग्ण व बाह्य रुग्ण दोन्ही वर उपचार करण्याची नामुस्की ओढवली आहे.या ही उपरचा प्रताप म्हणजे माहूर च्या प्रतिनियुक्तीवर वरील डॉक्टर पोटे यांची प्रतिनियुक्तीवर रद्द करण्या ऐवजी मांडवी च्या डॉ.मोहन अकोले यांना माहूर ला प्रतिनियुक्ती देण्याचे पत्र जिल्हा शल्य चिकित्सकाने काढले आहे.त्यामुळे माहूर च्या ग्रामीण रुग्णालयाचा अनागोंदी कारभार पुन्हा चवाट्यावर आला आहे.

◼️समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना मुख्यालय उपकेंद्राची एलर्जी…

माहूर सारख्या आदिवासी,बंजारा बहुल भागातील आरोग्य सेवा म्हणजे सर्वसामान्यांचा आधारवड, पण कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे गेल्या काही वर्षात नागरिकांतून आरोग्य विभागाबद्दलच्या तक्रारीत वाढ झाली आहे. बहुतांशी आरोग्य कर्मचारी तर कामापेक्षा कुरघोडीच्या राजकारणात व्यस्त असल्यामुळे त्याचा आरोग्य सेवेवर परिणाम होत असल्याबद्दलची अनेक उदाहरणे ताजी आहे.असे असले तरी ग्रामीण रुग्णालयाच्या कारभाराबाबत जिल्हाशल्य चिकित्सक व प्राथमिक आरोग्य केंद्रा बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी केवळ कागदी घोडे नचविण्यात मग्न असल्याने आरोग्य सेवेचे तीन तेरा झाले आहे.आरोग्य विभागात काम करणारे अनेक अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयी न राहता इतरत्र राहत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे ता. २८ ऑक्टोंबर २०२२ रोजी एक परिपत्रक काढून तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे
यांनी मुख्यालयी राहण्याचा आदेश दिले होते.मात्र माहूर ग्रामीण रुग्णालयाचे व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधीक्षक आणि कर्मचाऱ्यांना हे आदेश लागू पडत नाही असे या ठिकाणच्या परिस्थिती वरून जाणवते.ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी त्यांच्या सोयीनुसार आठवडे वाटून आळीपाळीने सेवा देतात तर उपकेंद्र स्तरावरील समुदाय आरोग्य अधिकारी हे महाशय आठवड्याचा एक दिवस ठरवून आरोग्य केंद्राला भेट देतात तर इतर दिवस आपल्या खाजगी रुग्णालय सांभाळत असल्याची अत्यंत धक्कादायक बाब समोर आलेली आहे. आज करण्यात आलेल्या पाहणीत तालुक्यातील गोकुळ आरोग्य उपकेंद्र अपवाद वगळता एकाही आरोग्य उपकेंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) सह आरोग्य कर्मचारी हजर नव्हते,स्थानिक ग्रामस्थांना याबद्दल विचारणा केली असता कुठे आठवड्याला बाजार दिवशी तर कुठे महिना गनती डॉक्टर येत नसल्याची माहिती समोर आली.माहूर तालुक्यात आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत हात मिळवणी करून समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचा समद कसं ओके मध्ये सुरू आहे.

◼️कोमात गेलेली आरोग्य यंत्रणा कधी जागी होणार?

माहूर तालुक्यातील आष्टा,वानोळा,ईवळेश्वर सिंदखेड व वाई बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात अगोदरच सुविधांची वानवा असताना औषधांचा तुटवडा जाणवू लागल्याने रूग्णांचे हाल होऊ लागले आहेत.तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेचा कारभार म्हणजे ‘रोजचे मडे त्याला कोण रडे’ असा झाला असून जिल्हा परिषद आरोग्य प्रशासन याबाबत काहीच कारवाई करत नसल्याने कोमात गेलेली आरोग्य यंत्रणा कधी जागी होणार? असा सवाल येथील नागरिक करत आहेत.

◼️बायोमेट्रिक हजेरी केवळ तोंडसुख घेण्याचे साधन….

माहूर तालुक्यात पाच आरोग्य केंद्र असून १० मंजूर पदे आहेत.त्यात वाई बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात एम.बी.बी.एस.तर वानोळा आरोग्य केंद्रात बी.ए.एम.एस.डॉक्टरांचे पद रिक्त आहे.तर २७ उपकेंद्र असून त्या ठिकाणी १३ समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) यांची पदे मंजूर आहेत.वास्तविक उपकेंद्रावर डॉक्टरानी सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत उपस्थित राहणे अनिवार्य आहे.मात्र दुर्गम भागातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी व उपकेंद्राचे सीएचओ आले कधी आणि गेले कधी ? हा स्थानिक नागरीकांना पडलेला प्रश्न आहे.त्यामुळे शासन आरोग्य सेवेवर कोट्यावधी रूपये खर्च करत असून देखील तळागाळातील सर्वसामान्य जनतेला योग्य आरोग्य सेवा मिळत नाही.त्यामुळे त्यांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे.एका परिपत्रका नुसार प्रत्येक आरोग्य केंद्रात बायोमेट्रिक यंत्र लाऊन त्यातील उपस्थिती नुसार वेतन अदा करण्याच्या सूचना आहे.मात्र पाच आरोग्य केंद्र २७ उपकेंद्रा पैकी किती ठिकाणी बायोमेट्रिक यंत्र बसविण्यात आले हा संशोधनाचा विषय आहे.आरोग्य सेवा लातूर परिमंडळ चे उपसंचालक डॉ.कमल चामले यांनी माहूर च्या आरोग्य विभागाच्या कारभाराचे अवलोकन केल्यास अनेक धक्कादायक वास्तव पुढे येतील मात्र एवढा वेळ त्यांना व जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना मिळेल तेव्हाच…खरे!

◼️वानोळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम मागील दोन वर्षापासून कासव गतीने !

माहूर तालुक्यातील वानोळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारती साठी आठ कोटी रुपये निधी मंजूर झाला असून सुरू असलेल्या इमारतीचे काम मागील तीन वर्षापासून कासव गतीने व निकृष्ट पद्धती ने सुरू असल्याने आदिवासी बहुल माहूर तालुक्यातील वानोळा परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ही ऐरणीवर आला आहे.त्या ठिकाणी मागील तीन वर्षापासून केवळ ओपिडी तपासणी करण्यात येते.कुठलीही शस्त्रक्रिया त्या ठिकाणी होत नाही.परिणामी दुर्गम भागातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन गंभीर रुग्णाला माहूर – पुसद,यवतमाळ कडे उपचारासाठी न्यावे लागते.

◼️वाई बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल गरोदर मातांचे जीव टांगणीला

तालुक्यात आरोग्य व्यवस्था सलाईनवर असल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याचा प्रकार वारंवार घडत असून वाई बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रातील मुख्यालय आरोग्य सेविका प्रसूतीसाठी दाखल माता रुग्णांना अजिबात प्रतिसाद देत नाही शिवाय प्रसूती करताना माता व बालकाच्या जीवाची परवा न करता प्रसूतीची थातूरमातूर प्रक्रिया उरकवून निघून जातात आशयाच्या अनेक तक्रारी झाल्यानंतर देखील आरोग्य विभाग ‘त्या’ महिला कर्मचारी विरुद्ध कारवाई करण्यास पुढाकार घेत नसल्याने गरोदर मातांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार दररोज घडत आहे.

फोटो:

माहूर: आवश्यक सेवा मिळत नसल्याने रुग्णांनी सुद्धा पाठ फिरवल्याने आष्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांचा शुकशुकाट

माहूर: सुरक्षित प्रसूतीसाठी अत्यावश्यक असलेले बाळंतपण पक्षांची देखील पूर्ती दुरावस्था झाली असून प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टा व आरोग्य उपकेंद्र मदनापूर येथील हिरकणी कक्षाचे हृदय हेलावून टाकणारे अत्यंत विदारक चित्र.

माहूर :प्रसूती आणि प्रथमोपचारासाठी स्थापन करण्यात आलेल्या आरोग्य उपकेंद्रात उपचार ऐवजी आरोग्य कर्मचाऱ्यांनी संसार थाटल्याचे पापलवाडी येथील दुश्य.

Share This Article
error: Content is protected !!