[छ. शिवाजी महाराज चौक ढाणकी येथील प्रकार.]
उमरखेड ता.प्रतिनिधी : मनोज राहुलवाड
उमरखेड – ढाणकी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुने बस स्टॉप येथून गांजेगाव कडे प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत चालू असलेले रोड चे काम, शहरानजीक छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुने बस स्टॉप येथे वर्दळीच्या ठिकाणी थोड्याशा पावसामुळे अक्षरशः पाण्याचे तळे साचले आहे. ढाणकी शहरातील एका राजकीय नेत्यामुळे सदर काम बंद करण्यात आले. असल्या महाभाग नेत्यांपुढे शासन प्रशासन नेमकं का नमतं घेत असेल ? विकास कामात रोडा आणणाऱ्या असल्या युवा नेत्याला शासन प्रशासन आपला खाक्या का दाखवत नसेल ? हा कुतूहलाचा प्रश्न आहे. कालच्या ५ मिनटाच्या पाण्यामुळे तिथे तालावाचे स्वरूप आल्याने वाहतुकीस व पायी ये-जा करणारे वाटसरू आणि प्रवासी यांना त्या ठिकाणाहून जाण्या येण्यास कसरत करावी लागत आहे. याचा नाहक त्रास सामान्य जनता भोगत आहे.
त्या ठिकाणी असलेल्या दुकानदार , व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आता पावसाळा चालू झाला आहे. पावसाळ्याच्या थोड्याच पाण्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाण्याचे डबके साचले आहे. यावर ढाणकीच्या विकासाचा बट्ट्याबोळ उघड्यावर आल्याची ग्रामस्थांमध्ये ओरड असून, प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत संबंधित अधिकारी याकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर पाणी साचल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, संबंधित विभागाने लवकरात लवकर अर्धवट रोड पूर्ण करून रस्त्यावरील पाण्यासाठी वाट काढून द्यावी व सदर रस्त्यामध्ये असलेले अतिक्रमण सुद्धा हटवावे. असे नागरिक बोलून दाखवतांना दिसत आहेत.