नांदेड – शाळा हे संस्काराचे विद्यापीठ असते. शाळेतूनच माणूस शिकून मोठा अधिकारी व सूज्ञ नागरिक होतो. आजतागायत कोणीही शाळा न शिकलेला व्यक्ती मोठा होऊ शकला नाही.अनेक समाजसुधारक, क्रांतिकारक ,मंत्री, विचारवंत, तत्त्वज्ञ,साहित्यिक,शास्त्रज्ञ हे सगळे शाळेतूनच पुढे गेले.शाळा ही आपणाला सांघिक भावना शिकवते. खिलाडू वृत्ती निर्माण करते.भेदभाव, अस्पृश्यता नाहीसा करते.आपण सगळे एक आहोत याची जाणीव करून देते.खेळाच्या तासाला सर्वजण आपण एकत्रित येऊन खेळ खेळतो. त्यातून राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते. खेळातून शरीरयष्टी बलदंड होते. शाळेमुळे आपल्यामध्ये नीतिमत्ता, वक्तशीरपणा,नीटनेटकेपणा,वैज्ञानिक दृष्टिकोन,स्त्री पुरुष समानता या गाभाभूत घटकांचा आपल्या मनावर परिणाम होतो.म्हणून समाजाने शाळेला स्वीकारलेले आहे.शाळा
सर्वांनाच ज्ञान देते. शाळेमुळे माणूस साक्षर होतो.शाळेमधूनच,समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता या गोष्टी शिकविल्या जातात.शाळेमध्ये अनेक सामूहिक गीते,देशभक्ती पर गीते पाठांतर करून घेतले जातात. तसेच अनेक प्रकारच्या प्रार्थना म्हटल्या जातात.शेतकरी,मजूर,कष्टकरी,श्रमिक,व्यापारी या सर्वांचीच माहिती शाळेच्या पाठ्य पुस्तकातून आपणास शिकवली जाते. म्हणून शाळा ही एक संस्काराची सरिता आहे.आपण सगळे एकत्रित शाळेमध्ये येऊन योगासने करतो. शाळेमधूनच वेगवेगळे विशेष दिन साजरे करून विद्यार्थ्याला सक्षम नागरिक बनवितात.राखी पौर्णिमा, मकर संक्रांत या सणातून आपलेपणा वाढतो. शाळेमधूनच निवडणुकीचे सुद्धा प्रशिक्षण वर्गात दिले जाते,शाळेत एक वर्षाचे मंत्रिमंडळ तयार केले जाते.अशीही शाळा प्रत्येकाला हवीहवीशी वाटते.
आज शाळेमुळेच आपण सगळे बौद्धिकदृष्ट्या प्रगल्भ होत आहोत. शाळा ही सर्वांना शिस्त शिकविते. रांगेत उभे रहा. रांगेनुसार चला,खरे बोला, वडीलधाऱ्या व्यक्तीचा आदर करा.प्राणीमात्रावर दया करा हे आपल्याला शाळा सांगते. कितीतरी गोष्टी शाळेतून शिकवल्या जातात.
शाळेमध्ये असणारे गुरुजी,शिक्षक विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाचे, प्रगतीचे धडे देतात,मातृभाषेतून शिकवून भाषेचा विकास करतात.
त्यामुळे आपली मायबोली आपण सहज शिकून जातो.शाळेमध्ये इतर भाषा सुद्धा शिकवून जगातल्या इतर भाषेचे ज्ञान विद्यार्थ्यांना करून दिले जाते.म्हणून शाळा हे ज्ञान देणारे विद्यापीठ आहे.आई- वडील मुलांना शाळेत आणून बसवतात,मुलं सुरुवातीला रडतात,शाळेतून निघून घरी जातात,परत त्यांना शाळेत आणून बसवले जाते ही सर्व जडणघडण विद्यार्थ्यांची लहानपणी शाळेतच होते.राग,लोभ,चांगले,वाईट,स्वातंत्र्य पारतंत्र्य अभिमान,स्वाभिमान हे सर्व शाळेतूनच शिकविले जातात. म्हणून शाळेने आम्हाला सर्व काही दिले. ज्यांना वेळेचे आणि पुस्तकाचे महत्त्व कळले, तेच जीवनात यशस्वी झाले. शाळेमध्ये पुस्तकातून माणसाला जीवनाचे योग्य ज्ञानाचे धडे वाचायला शिकवतात. तेव्हा विद्यार्थी आव्हानात्मक प्रसंग सुद्धा सहजासहजी सोडवतात हे सर्व आपणाला शाळा शिकवते.शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात. त्यातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होतो,म्हणून शाळा ही सर्व समाजाला घडवते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही .
आजच्या परिस्थितीत मुले भरकटलेली दिसून येत आहेत.मुले शाळेतून, कॉलेजमध्ये जातात, तिथे गेल्यानंतर अनेक नवीन मित्र-मैत्रिणी भेटतात आणि पुढे मग त्यांचा समाजाशी व इतर घटकाशी संपर्क येतो आणि हळूहळू काही मुले वाममार्गाकडे जातात. ही मुले पुढे गुन्हेगारीच्या क्षेत्रात जाऊन छोटे- मोठे गुन्हे करायला शिकतात हे सर्व त्यांनी केलेल्या कर्माची फळे असतात.कर्म नीट करत चला, तुम्हाला चांगले फळ मिळतील जर तुम्ही वाईटाच्या संगती मध्ये गेलात तर तुमचे वाईटच होईल म्हणून *सुसंगती सदा घडो* असे विचारवंत म्हणतात.काही श्रीमंतांची मुले सुद्धा वाईट संगतीमुळे वाममार्गाला लागून आयुष्याचे वाटोळे करून घेतात. झरा जसा एखाद्या पर्वतातून उगम पावतो तिथे तो अतिशय स्वच्छ असतो, परंतु पुढे पुढे जाऊन तो वेगवेगळ्या नद्यांना मिळतो,त्यामुळे त्याच्यामध्ये केर-कचरा,खत,मूत्रविसर्जन प्लॅस्टिकच्या पिशव्या,कारखान्याचे दुर्गंधी युक्त पाणी,गाई गुरे धुणे हे त्यामुळे ते पाणी दूषित बनते तसेच विद्यार्थी ही पुढील जीवनात चुकीच्या व्यक्तीच्या मागे लागून दुष्कृत्य करतात.अन्याय अत्याचाराच्या सावलीला बसतात.आई-वडिलांचे ऐकत नाहीत,मित्र-मैत्रिणी जे बोलतात तेच खरं आहे असे त्यांना वाटते, वय वाढत जाते ,केस वाढवून देवानंद होतात.विवेकानंद होण्याचे विसरून जातात.कितीतरी तरुण मुलं-मुली आज व्यसनाधीन झालेली आहेत. अफू ,गांजा,चरस ,ड्रग्ज तंबाखू ,गुटखा, सिगारेट, दारू यापासून ते सुटू शकले नाहीत.तरुण मुले-मुली आज आपल्या कर्माची फळ भोगत आहेत.आई-वडिलांच्या समोर काही मुला-मुलींचा मृत्यू होत आहे,
ही अतिशय खेदजनक बाब आहे.
तंबाखू चघळून कर्करोगाला निमंत्रण देतात.अल्कोहोल मिश्रित अनेक पेय पिऊन शरीराचे चाळणी करून घेतात. त्यातून वेगवेगळे दम्याचे आजार उद्भवतात आणि अकाली त्यांच्या कर्माची फळ ते भोगतात,म्हणून मला म्हणावं वाटते की? शाळेने विद्यार्थ्यांना भरपूर घडविले परंतु ते त्यांच्या स्वतःच्या कर्माने बिघडून गेले.
जशी तुमची संगत तशी तुमचे कर्म असं म्हटलं जाते.चंदन तुमच्या हाताला लागले की हात सुगंधित होतात. कोळशाला हात लावल्यास हात आपोआप काळे होतात ,म्हणून चांगल्याच व्यक्तीची संगत धरा, चांगलेच मित्र तयार करा. तुमच्या जीवनात कष्टाला फार महत्त्व आहे. त्यासाठी कष्ट करा. तरच हे जीवन सुंदर आहे,असे म्हणता येईल.आज आपण सर्वत्र पाहत आहोत.तरुण झिंगत आहेत ,तरुणांना उद्याचे भविष्य नाही. व्यसन करून थुंकून थुंकून तोंडातली लाळ संपून जात आहे,वीस-वीस दिवस न धुतलेली जीन्स घालून वर केसाचा कोंबडा करून अनेक तरुण आज चुकीच्या दिशेने पावले टाकत आहेत. काही जण रात्र झाली की घराबाहेर पडतात.रेल्वे टेशन,बस स्टेशन गर्दीच्या ठिकाणी आज अनेक तरुण चुकीच्या मार्गाने जाऊन वाईट कृत्ये करून तुरुंगात जाऊन बसत आहेत,म्हणून तरुणांना मला हे सांगायचं आहे की ? तुम्ही तुमच्या अंगी जिद्द बाळगा,त्यावेळेस तुम्हाला कर्माची चांगली फळे मिळतील.तुम्ही कडुनिंबाचे झाड लावून आंब्याची अपेक्षा करू नका.आज व्यापारामुळे आपला देश जगाशी जोडला गेला आहे खाजगीकरण,उदारीकरण, जागतिकीकरण यामुळे आपण दळणवळणाशी एकत्रित जोडले गेलो आहोत.सध्याची तरुणाई व्यायामा पासून दूर आहे.गड ,पर्वत, किल्ले चढून त्यांना माहित नाही. घरातल्या घरात बसून सुडौल होत आहेत. चपळाई फार कमी झालेली आहे.धावणे,पळणे,खो,खो खेळणे, कबड्डी ,कुस्ती,लगोरी ,विटीदांडू, या खेळापासून तरुण फार दूर आहेत.
त्यामुळे ते वेगवेगळ्या रोगांनी आजारानी त्यांना पछाडलेले आहे.
हे सर्व आपल्या कर्माने आपणाला बिघडून टाकले आहे.तुम्ही चांगले कर्म करा. चांगली फळे तुम्हाला मिळतील. म्हणूनच शाळेनी घडविले आणि खरोखरच कर्माने अनेक जणांना बिघडविले आहे.यात तीळमात्र शंका नाही हे वास्तविक कटू सत्य आहे.
जे काल सत्य होतं,ते आज सत्य आहे आणि उद्याही सत्य राहणारच आहे.
म्हणून शाळा सुरू झाल्या आहेत. चांगले शिका,संघटित व्हा,एकात्मता पाळा. भेदभावापासून दूर राहा.
कोणाच्या दबावाखाली दडपणाखाली वागू नका. पर स्त्रीला मातेसमान माना शाळेतले संस्कार आपणास जीवनभर स्मरणामध्ये राहतात.आपले कर्म आपले जीवन घडवितात.कर्मा नुसार ज्याच्या त्याच्या फळे मिळतात.कर्म जर वाईट आहे असे म्हणून आपण वाईट वागलो तर त्याची फळे ही वाईट मिळतात, म्हणून नीतीने चला,जमेल तेव्हा गरीबाची सेवा करा,त्यातून भरपूर आनंद मिळेल,आपल्या अंगणात वृक्ष लावले की दुसऱ्यांच्या अंगणात सावली पडते, फुले पडतात, निसर्ग जसा सर्वांना घेऊन चालतो, तसेच आपणही सर्वांना घेऊन चालावे. शेवटी *जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो* *भुता परस्परे पडो । मैत्र जीवाचे ।।* जे वाईट आहेत.त्यांना शिक्षा मिळेल,जे चांगले आहेत त्यांना सुमधुर फळे मिळतील. म्हणून शाळा संस्कार देते,आपण कर्मानुसार चांगले वाईट वागून त्यानुसार फळे घेत असतो. या लेखांमध्ये एवढेच सांगणे आहे की कर्म चांगले करा, फळे आपोआप चांगले मिळतील.
प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत
अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड