महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये, गव्हासकट किडे रगडले..कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

abhishek bakkewad
4 Min Read
Spread the love

जन्म मृत्यू नोंदणी विभागात आयुक्तानी लक्ष देण्याची गरज

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – शहरात गेल्या 26 जून रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांनी महापालिकेतील लिपिक,पुरुष मजूर,जकात जवान,चौकीदार, शिपाई यासह वेगवेगळ्या विभागात कार्यरत असलेल्या जवळपास 51 कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदलीचे आदेश पारित केले.त्यानंतर दुसऱ्या दिवशीही जवळपास 20 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.या बदल्या करताना एकाच ठिकाणी दहा ते पंधरा वर्षे ठाण मांडून बसलेले कर्मचारी तसेच कर वसुली कमी करणारे कर्मचारी यांच्याच बदल्या केल्या असल्याचं सांगण्यात आलं.परंतु प्रत्यक्षात मात्र अनेक कर्मचाऱ्यांना वसुली चांगली असताना आणि संबंधित विभागात कार्यरत राहण्याचा कालावधी सुद्धा कमी असताना त्यांना बदलीचे आदेश देण्यात आले,असा नाराजीचा सूर बदली झालेले कर्मचारी आळवू लागले आहेत.

मुळात महानगरपालिके अंतर्गत असलेल्या मालमत्ता धारकाकडून मालमत्ता कर आणि पाणी कराची थकित रक्कम अडीचशे कोटी रुपयांच्या वर पोहोचली आहे.

मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी गेल्या वर्षभरात मालमत्ता आणि पाणी कर वसुलीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने योजना राबवून प्रयत्न केले.मालमत्तांना टाळे ठोकणे,नळ जोडणी खंडित करणे इतकेच नाही तर थकीत मालमत्ता व पाणी कर धारकांच्या घरासमोर गांधीगिरी करीत, बँडबाजा लावून कर वसुली करणे,असे नानाविध प्रयोग करण्यात आले.अर्थात काही नागरिकांनी याचा कडाडून विरोध केला. परंतु गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी महानगरपालिकेला मालमत्ता आणि पाणीपट्टीच्या करापोटी चांगला महसूल मिळाला. याशिवाय हजारो अनाधिकृत नळ जोडण्या अधिकृत करून त्यांना पटलावर आणलं गेलं. यातून तर महानगरपालिकेला वर्षाकाठी जवळपास दोन कोटी 50 हजार रुपये इतके कायमस्वरूपी उत्पन्न सुनिश्चित झाले. बिल कलेक्टर वसुली लिपिक यांना वेळोवेळी आयुक्तांनी बैठका घेऊन कर वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. त्यामुळेच महापालिकेच्या महसुलामध्ये गतवर्षीच्या तुलनेत बऱ्यापैकी वाढ दिसून आली.

दरम्यान एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणे अनिवार्य आहे, हे जरी आवश्यक असले तरी, आता नवीन आलेल्या कर्मचाऱ्यांना ही कर प्रणाली तसेच संबंधित झोनचा एरिया समजून घेण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. सध्या पावसाळा सुरू आहे.

संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणावर बळावण्याची शक्यता यामुळे निर्माण होत असते.त्यामुळे आरोग्य विभागातही अनुभवी कर्मचारी असणे गरजेचे आहे. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन करताना महापालिकेचे अग्निशमन दल अनुभवी कर्मचाऱ्यांच्या बळावर तत्परतेने काम करीत असते.

असे असताना एकट्या कर विभागासोबतच आरोग्य आणि अग्निशमन विभागातील किंवा आपत्ती व्यवस्थापन विभागातील अनुभवी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित झाला आहे.

बदली झालेले अनेक कर्मचारी त्या त्या विभागात रुजू होऊन किमान एक ते दोन वर्षे झाली आहेत. ज्यांच्यावर कमी कर वसुलीचे खापर फोडण्यात आले, प्रत्यक्षात त्यापैकी अनेक कर्मचाऱ्यांनी चांगली कर वसुली केली आहे.तरीही त्यांची बदली करण्यात आली आहे.त्यामुळे बदल्या करताना ज्या कसोट्या महापालिकेने ठरवल्या त्यांचाही भंग झाल्याचं चित्र दिसून येत आहे.

दरम्यान,आयुक्तांची दिशाभूल करून संबंधित अधिकाऱ्यांकडून आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या,आधी बदल्या करण्याची शिफारस करायची आणि त्यानंतर काही दिवसांनी स्वतःच काही बदल्या रद्द करण्यासाठी पुन्हा आयुक्तांना साकडे घालायचे, हा प्रकार नांदेड महानगरपालिकेत नवा नाही. त्यामुळे हा चिरीमिरीचा खेळ आहे. बदली प्रक्रियेचा विरोध नाही, मात्र बदल्या करताना गव्हासकट किडे रगडले गेले, असेही नाराज कर्मचाऱ्यांमध्ये बोलले जात आहे.दरम्यान कर्मचाऱ्यांच्या या बदली प्रकरणामुळे नांदेड महानगरपालिकेची वर्ग 3 आणि 4 कर्मचाऱ्यांची यंत्रणा कोलमडते की काय,अशी भीती निर्माण झाली आहे.

मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी स्वतःच पुन्हा एकदा या बदली प्रक्रियेचा विचार करावा,अशी मागणीवजा चर्चा सध्या महापालिका परिसरात जोरात सुरू आहे.

Share This Article
error: Content is protected !!