अमरावती – लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या पराभवानंतर त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यासमोरील अडचणी आता वाढू लागल्या आहेत.
अमरावती : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या पराभवानंतर त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यासमोरील अडचणी आता वाढू लागल्या आहेत. रवी राणा हे महायुतीचे घटक असताना भाजपमधूनच त्यांच्या बडनेरा मतदार संघातील दावेदारीवर उघड विरोधाचे सूर उमटले आहेत.
नवनीत राणा यांना बडनेरा मतदार संघातून २६ हजार ७६३ इतके मताधिक्य मिळाले. हे भाजपमुळेच मिळाले, असा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजपच्या बडनेरा मंडळाच्या कार्यकर्ता संवाद बैठकीत आमदार रवी राणा यांच्याविषयीचा रोष व्यक्त झाला. या बैठकीला पक्ष निरीक्षक म्हणून भाजपच्या ज्येष्ठ नेत्या किरणताई महल्ले उपस्थित होत्या. आम्ही आता दुसऱ्यांची पालखी वाहणार नाही. लोकसभा निवडणुकीत झालेली चूक पुन्हा पक्षाने करू नये. लोकसभेत आम्ही पक्षश्रेष्ठींचे ऐकले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आम्ही एकजूट दाखवून प्रचार केला. मात्र, आता भाजपा कार्यकर्ता असा लादलेला उमेदवार स्वीकारणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपा कार्यकर्त्यांनी एकसूरात मांडली.