मुंबई – गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांच्याविरुद्ध ईडी आणि सीबीआयने कारवाई केली होती. त्यामुळे देशमुखांना तुरुंगात जावं लागलं होतं. १३ महिन्याचा तुरुंगावासानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या षडयंत्राचा भाग असल्याचा गंभीर आरोप देशमुखांनी केला.
नाना पटोले काय म्हणाले?
“केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशातील राजकारणाची स्थिती बदलून गेली आहे. जे लोक भाजपाच्या विरोधात असतील त्यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयोग मोठ्या प्रमाणात झाला. हा प्रयोग महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात झाला. जे लोक त्यांच्याबरोबर गेले त्यांना सर्व आरोपांमधून मुक्त करण्यात आलं. त्यांच्यावरील ईडीच्या कारवाया थांबवण्यात आल्या. त्यांना क्लिन चीट देण्यात आली. आता आपण पाहिलं की, अनिल देशमुखांनी जे काही आरोप केले आहेत, त्यामध्ये सत्यता असेल. सत्तेचा दुरुपयोग भाजपा करत आहे”, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला.