बँक ऑफ बडोदा च्या 117 व्या वर्धापन दिनानिमित्त जि प उच्च प्राथमिक शाळा चिलपिंपरी यांना वॉटर प्युरिफायर चे वाटप

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

तालुका प्रतिनिधी /राहुल कोलते

मुदखेड – महामानव राजा सयाजीराव गायकवाड यांनी 117 वर्षांपूर्वी केवळ दहा लाख रुपये भांडवलावर बँक ऑफ बडोदा ही बँक सुरू केली. अनेक चढउतार झेलत ही बँक यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करीत आहे. आज जगभरात जवळपास आठ हजार शाखा बँक ऑफ बडोदा च्या असून अनगिनत रुपयांचा व्यवहार सदरील बँकेमधून होत आहे, हा केवळ ग्राहकांनी दाखवलेला विश्वास आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कष्टाचे फळ आहे.

 

केवळ 2014 हे वर्ष वगळता प्रत्येक वर्षी बँक नफ्यामध्येच आहे. ही बँक सतत नफ्यात राहावी यासाठी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सर्व कर्मचारी रात्रंदिन मेहनत करत असतात. ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा आणि तत्पर सेवा देण्याचे काम या बँकेतील कर्मचारी करतात म्हणूनच ही बँक दरवर्षी नफ्यामध्ये राहते.

 

केवळ नफा कमवणे हा या बँकेचा उद्देश नसून या बँकेच्या माध्यमातून समाजाच्या हिताची कामे व्हावीत, व्यावहारिक आणि आर्थिक जनजागृती व्हावी यासाठी या बँकेतील कर्मचारी सतत धडपडत असतात. याचाच एक भाग म्हणून 117 व्या वर्धापन दिनानिमित्त बँक ऑफ बडोदा च्या माळकोटा शाखेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी चिलपिंपरी ता. मुदखेड येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला पंधरा हजार रुपये किमतीचे एक वॉटर प्युरिफायर

सप्रेम भेट दिले असून सदरील प्युरिफायर मुळे विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यास मदत होणार आहे.   याप्रसंगी शाखेचे व्यवस्थापक रामेश्वर दामुके व नवनियुक्त व्यवस्थापक सागर हजारे यांच्यासह माणिकराव जाधव, प्रवीण आढाव व मधुकर कदम साहेब उपस्थित होते.

 सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक चंद्रकांत घोडगे ,यशवंत महाजन, आनंदा गाढे व पत्रकार राहुल कोलते यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक शेख नूर यांनी तर आभार विष्णुकांत शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!