जिल्हा/तालुका प्रतिनिधी:-अशोक वाघमारे
नांदेड – आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संकल्पपूर्ती सोहळा यावर्षी संपन्न होत आहे.
पारायणाचं हे सातवं वर्ष आहे सन २०१८ मध्ये अवघ्या ४२ साधकांना सोबत घेऊन सुरू केलेला हा प्रवास या वर्षी ९०३३ साधकांच्या पुढे गेलेला आहे.आम्ही वारकरी परिवाराने “घर तिथे ज्ञानेश्वरी! घरोघरी ज्ञानेश्वरी” हे ब्रीद मनाशी बाळगुन गेल्या सात वर्षात नांदेडसह महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या सीमेलगत असणाऱ्या अनेक जिल्ह्यांमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी मोफत आणि घरपोच पोहोचवली आहे. आम्ही वारकरी परिवाराचा संकल्प होता माऊलीच्या ज्ञानेश्वरी मध्ये “जेवढ्या ओव्या आहेत तेवढे साधक पारायनासाठी बसवणे.” अर्थात माऊलीच्या ज्ञानेश्वरीत ९०३३ ओव्या आहेत तेवढे साधक पारायनास बसवणे. हा संकल्प यावर्षी सिद्धीस गेलेला आहे.आतापर्यंत झालेल्या नोंदीनुसार ९३०० साधक पारायणास यावर्षी बसलेले आहेत.आम्ही वारकरी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष हभप राम महाराज पांगरेकर यांनी माऊलीच्या ज्ञानेश्वरीचे पारायण करण्याची एक आगळीवेगळी संकल्पना सर्वांसमोर ठेवली. साधकांनी पवित्र अशा श्रावण महिन्यात आपल्याच घरी आपल्या सोयीच्या वेळेनुसार ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे दररोज ठराविक ओव्यांचे पारायण करायचे आणि सांगता मात्र सर्व साधकांनी एकत्र येऊन साजरी करायची. जे साधक पारायनासाठी बसलेले आहेत त्या सर्व साधकांना एक दिवस एकत्र घेऊन सांगता सोहळा साजरा करण्याचे काम गेल्या सहा वर्षापासून आम्ही वारकरी परिवार करत आहे. यावर्षीचे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दिनांक:५ऑगस्ट २०२४ अर्थात श्रावण शुद्ध प्रतिपदा, वार:सोमवार या दिवशी सुरू होत आहे.पारायणाची सांगता दिनांक: ९ सप्टेंबर २०२४ अर्थात भाद्रपद षष्ठी वार: सोमवार या दिवशी वैकुंठवासी उद्धवराव पाटील कौडगावकर यांचे मामा मंगल कार्यालय मारतळा ता.लोहा जि. नांदेड येथे होणार आहे. या पारायनाच्या संकल्पपूर्तीसाठी आम्ही वारकरी परिवारातील लहान थोरापासून सर्वांनी रात्रंदिवस परिश्रम घेतलेले आहेत. विशेष म्हणजे आम्ही वारकरी परिवाराचे मार्गदर्शक रावसाहेब पा. शिराळे दतराम पा. येडके रामजी पा.शिंदे,प्रभाकर पा.पूय्यड,दत्तरामजी गोरठेकर, नारायण मामा समदुरे संस्थेचे संस्थापक सचिव व्यंकट महाराज जाधव माळकौठेकर संस्थेचे सर्व संस्थापक सदस्य आणि विशेष करून पारायण नाव नोंदणी करणे, याद्या बनवणे, ग्रुप मध्ये प्रत्येकाला ऍड करणे, प्रत्येकाला कॉल मेसेज करणे यासाठी अनेक नव तरुणांनी रात्रंदिवस परिश्रम करून हा संकल्प पूर्णत्वास नेलेला आहे. आम्ही वारकरी परिवाराच्या या कार्याचे जिल्ह्यासह महाराष्ट्रभरातून सर्वत्र कौतुक होत आहे.