पुणे – कोणीही कुठल्याही धर्माबाबत किंवा समाजाबाबत वाईट बोलता कामा नये” असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. आळंदी येथील एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले, “तुम्ही तुमच्या विचारधारा मांडा. परंतु, ते करत असताना समाजात दुही निर्माण करू नका. कोणी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचा विरोध करत राहील”.
हे वक्तव्य करत असताना अजित पवारांचा नेमका रोख कोणाकडे होता हे समजू शकलेलं नाही. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये महायुतीमधील काही नेत्यांनी मुस्लिमविरोधी वक्तव्ये केली आहेत. भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवारांचा रोख नितेश राणेंकडे होता का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.